मुंबई : आयटीआय प्रवेशासाठी 1 लाख 80 हजार विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज केले आहेत. यातील 1 लाख 63 हजार 808 विद्यार्थ्यांनी शुल्क भरून आपले अर्ज निश्चित केले आहेत, तर 1 लाख 11 हजार 640 विद्यार्थ्यांनी पसंतीक्रम भरले असल्याची माहिती व्यवसाय व प्रशिक्षण संचालनालयाकडून देण्यात आली.
आयटीआयच्या 1 लाख 54 हजार जागांसाठी तब्बल 1 लाख 80 हजार 15 विद्यार्थ्यांनी अर्ज नोंदणी केली आहे. यातील 1 लाख 66 हजार 606 विद्यार्थ्यांनी आपला अर्ज अंतिम केला. त्यापैकी 1 लाख 63 हजार 808 विद्यार्थ्यांनी नोंदणी शुल्क भरले आहे. 26 मे पासून विद्यार्थ्यांना पसंतीक्रम भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली. त्यानुसार आतापर्यंत अर्ज निश्चिती केलेल्या विद्यार्थ्यांपैकी 1 लाख 11 हजार 640 विद्यार्थ्यांनी पसंतीक्रम भरले आहेत.
प्रवेश अर्ज भरल्याची मुदत संपल्यानंतर सर्वसाधारण गुणवत्ता जाहीर होईल. यानंतर विद्यार्थ्यांना हरकती नोंदविण्यासाठी मुदत दिली जाणार असून त्यानंतर तात्पुरती गुणवत्ता यादी जाहीर होईल. त्यानंतर पहिली गुणवत्ता यादी जाहीर होणार आहे.