मुंबई : तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी बोलाविल्यामुळेच मी त्यांच्या निवासस्थानी गेलो होतो. स्वतःहून गेलो नाही, असे स्पष्टीकरण जनसुराज्य शक्ती युवा संघटनेचे अध्यक्ष समित कदम यांनी माध्यमांशी बोलताना केले.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि तत्कालीन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मला माझ्या काही अडचणींमध्ये मदत करावी, अशी इच्छा अनिल देशमुख यांनी माझ्याकडे व्यक्त केली. तसा निरोप पोहोचवण्याची विनंतीही त्यांनी केली, असे कदम यांनी सांगितले. फडणवीस यांनी कोणतेही प्रतिज्ञापत्र दिलेले नव्हते. देशमुख यांना भेटा, असे फडणवीस यांनी मला कधीच सांगितले नव्हते, असे स्पष्टीकरण त्यांनी दिले.
माझ्या अडचणीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि तत्कालीन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना मदत करायला सांगा, अशी विनंती अनिल देशमुख यांनी आपल्याला केली होती.समित कदम, जनसुराज्य शक्ती युवा संघटनेचे अध्यक्ष
माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फेरी झडत आहेत. 'ईडी' कारवाईपासून वाचण्यासाठी भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी मला ऑफर दिली होती, असा गंभीर आरोप अनिल देशमुखांनी केला होता. फडणवीस यांची ऑफर घेऊन येणारा व्यक्ती कोण? याबाबतही देशमुखांनी खुलासा केला आहे. एका इंग्रजी दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी संबंधित व्यक्ती म्हणजे जनसुराज्य शक्ती युवा संघटनेचे अध्यक्ष समित कदम असल्याचे म्हटले होते.
प्रतिज्ञापत्रावर स्वाक्षरी करण्यासाठी फडणवीस यांनी कदम यांना माझ्याकडे पाठवले होते. तेच माझ्या निवासस्थानी आले होते. फडणवीस यांना तुमच्याशी बोलायचे आहे, असे ते म्हणाल्याचा दावा देशमुख यांनी केला आहे. कदम यांनी त्यावेळी फडणवीस यांना फोन लावला. त्यांनी एका लिफाफ्यामध्ये प्रतिज्ञापत्र आणले होते. त्याच्यासोबत भेटीचे माझ्याकडे व्हिडीओ फुटेज आहेत, असेही देशमुख म्हणाले.
समित कदम हे मुळचे मिरजेचे आहेत. ते जनसुराज्य युवा शक्तिमध्ये २००८ पासून काम करत आहेत. आता ते जनसुराज्य पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आहेत. आमदार विनय कोरे यांच्यासोबत ते काम करतात, समित कदम हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जवळचे मानले जातात. त्यांनी आतापर्यंत एकही निवडणूक लढलेली नाही. येणाऱ्या विधानसभा निवडणूकीत ते इच्छुक असल्याचे बोलले जात आहे. काही दिवसापूर्वी मिरजमध्ये तसे बॅनर्सही लावण्यात आले होते. मिरजेत ते वेगवेगळे कार्यक्रमाचे आयोजन करत असतात. गेल्या वर्षी त्यांनी दही हंडीचा आयोजित केली होती.