मुंबई

लोकसभा निवडणूक मनसे स्वबळावर लढणार?

दिनेश चोरगे

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : आगामी लोकसभा निवडणुका स्वबळावर लढविण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची तयारी सुरू आहे. प्रत्येक मतदारसंघाचा आढावा घेण्यात येत आहे. मात्र, कोणत्याही पक्षासोबत युतीचा अंतिम निर्णय हा पक्षाध्यक्ष राज ठाकरेच घेतील, अशी माहिती मनसे नेते नितीन सरदेसाई यांनी सोमवारी दिली.

लोकसभा मतदारसंघांचा आढावा घेण्यासाठी मनसेने अलीकडेच समन्वयक नेत्यांची नियुक्ती केली होती. गणेशोत्सवापूर्वी या समन्वयकांना आपला अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले होते. या समन्वयकांची सोमवारी, मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी विशेष बैठक पार पडली. यावेळी मनसेचे नेते अमित ठाकरे, बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई, शिरीष सावंत यांच्यासह मुंबई आणि ठाण्यातील प्रमुख नेते उपस्थित होते. या बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना नितीन सरदेसाई यांनी लोकसभा निवडणुका स्वबळावर लढविण्याच्या दृष्टीने तयारी सुरु असल्याचे सांगितले.

आजच्या बैठकीत समन्वयक नेत्यांनी विभागनिहाय बैठकींचा तपशील यावेळी राज ठाकरे यांना दिला. तसेच, लोकसभा मतदारसंघातील राजकीत स्थिती, मनसेचे संघटन आदीची तपशीलवार माहितीही समन्वयकांनी राज यांना दिली. आजच्या बैठकीत सुमारे २० लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेण्यात आला. येत्या काळात उर्वरित मतदारसंघाचाही आढावा घेतला जाणार असल्याची माहिती मनसेतील सूत्रांनी दिली.

दरम्यान, वर्षभरापासून भाजप आणि शिंदे गटासोबत मनसेच्या संभाव्य युतीच्या उलटसुलट चर्चा सुरु आहेत. राज ठाकरे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विविध निमित्ताने होर्णाया भेटींनीही या चर्चेला खतपाणी घातले. मात्र, युतीबाबत ठोस निर्णय होत नसल्याने पक्षपातळीवर स्वबळाची तयारी ठेवण्याची भूमिका मनसेने घेतली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT