मुंबई; पुढारी वृत्तसेवा : Malik vs Wankhede : एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्या पत्नी क्रांती रेडकरच्या बहिणीवर पुण्यात ड्रग्जची केस नोंदवलेली आहे. सदर प्रकरण प्रलंबित असून वानखेडेंनी या प्रकरणी उत्तर द्यावे, असे आव्हान राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी दिले आहे.
मलिक यांनी याबाबत सोमवारी एक ट्वीट केले आहे. या ट्वीटमध्ये त्यांनी काही स्क्रिनशॉट्सही जोडलेले आहेत. वानखेडे यांना उद्देशून मलिक म्हणतात, तुमची मेहुणी हर्षदा दिनानाथ रेडकर ही ड्रग्जच्या व्यवसायात सामील आहे की काय? तुम्हाला या प्रश्नाचे उत्तर द्यावे लागेल. कारण तिच्याविरोधातील केस पुणे कोर्टात प्रलंबित आहे.
मलिक यांच्या ट्विटला क्रांती रेडकर यांनी ट्विटरवरूनच प्रत्युत्तर दिले आहे. त्या म्हणतात की, नवाब मलिक यांनी केलेल्या ट्विटवरून माध्यमांना अनेक प्रश्न पडले आहे. पण, मी सांगु इच्छीते की, त्या प्रकरणात माझ्या बहिणीला गोवलं गेले आहे. सध्या ते प्रकरण न्याप्रविष्ट आहे, त्यामुळे मी त्यावर काही भाष्य करणार नाही. माझी बहिण कायद्याच्या चौकटीत राहुन नवाब मलिकांना उत्तर देईल, असं त्यांनी म्हटलंय.