मुंबई : नवा आयफोन 17 तातडीने आपल्या हातात असावा यासाठी मुंबईकरांनी बीकेसीमधील अॅपल स्टोअरमध्ये केलेल्या गर्दीने यापूर्वीचे सर्व उच्चांक तोडले. गुरुवारी रात्रीपासूनच अॅपलप्रेमींनी रांग लावली होती. सकाळ होताच ही रांग प्रचंड मोठी झाली. या गर्दीत काही तरुणांमध्ये हाणामारी झाली. त्यांना सीआरएफ आणि स्टोअरच्या सुरक्षा कर्मचार्यांनी रांगेतून बाहेर काढले.
आयफोन 17 खरेदी करण्यासाठी तरुणांमध्ये प्रचंड उत्साह दिसून आला. एका ग्राहकाने तर गुरुवारी रात्री 8 वाजताच रांग लावली होती. त्याने नारंगी रंगांचा आयफोन 17 प्रो-मॅक्स खरेदी केला. या फोनमध्ये ए-19 बायोनिक चीप असल्यामुळे गेमिंगचा अनुभव आनंददायी असेल, असे आणखी एका ग्राहकाने सांगितले. एका ग्राहकाने तर दोन आयफोन खरेदी केले.
आयफोन-17 ची वैशिष्ट्ये
यावेळी अॅपलने कॅमेरा गुणवत्ता, प्रोसेसर गती आणि बॅटरी कामगिरीमध्ये विशेषतः सुधारणा केली आहे. तंत्रज्ञान तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, आयफोन 17 मध्ये एआय-आधारित वैशिष्ट्ये, जलद चार्जिंग आणि पूर्वीपेक्षा सडपातळ आणि हलके डिझाइन आहे. नवीन आयफोनमध्ये आयफोन एअर समाविष्ट आहे, जो आतापर्यंतचा सर्वात पातळ आयफोन असल्याचे म्हटले जाते. त्याची जाडी फक्त 5.6 मिमी आहे. याव्यतिरिक्त, अॅपलने तीन नवीन आयफोन 17 मॉडेल लाँच केले आहेत.
मुंबईकरांचे अॅपलप्रेम पाहता या कंपनीने भारतात सर्वांत पहिले रिटेल स्टोअर मुंबईतील बीकेसीमध्ये उघडले. त्यानंतर दिल्लीमध्ये हे स्टोअर सुरू झाले. अॅपल स्टोअरमधून आयफोन खरेदी करणे हे अनेकांचे स्वप्न असते. मुंबईकरांनी या स्टोअरला आतापर्यंत मोठा प्रतिसाद दिला आहे.
9 सप्टेंबर रोजी आयफोन 17 सीरिज लाँच करण्यात आली. तेव्हापासून प्रीबुकिंग सुरू करण्यात आले होते. आयफोन 17 ची किंमत 80 हजार ते दोन लाखांपर्यंत आहे. देशाच्या विविध भागांतून नागरिक आयफोन 17 खरेदी करण्यासाठी मुंबईत आले आहेत. काही जण तर अहमदाबादमधूनही आले आहेत.