मुंबई : तीन महिन्यांत लाखोंचा नफा करून देण्याचे आमिष दाखवून एका शिपिंग व्यावसायिकाची तब्बल ४१ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी झाकिरुद्दीन सय्यद आणि त्याची दोन्ही मुले शेहबाज सय्यद व जबिल सय्यद यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शिपिंग व्यवसायात कार्यरत असलेले अनिस खान यांनी दिलेल्या तक्रारीवरून जे. जे. मार्ग पोलीस ठाण्यात सय्यद पिता-पुत्रांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. व्यावसायिक कर्जाच्या नावाखाली मोठी रक्कम गुंतवल्यास केवळ तीन महिन्यांत दुप्पट परतावा मिळेल, असे आमिष आरोपींनी दिल्याचा आरोप आहे.
तक्रारीनुसार, अनिस खान यांच्याकडून ४१ लाख रुपये घेण्यात आले. एवढेच नव्हे तर या रकमेवर व्याज स्वरूपात आणखी २० लाख रुपये अतिरिक्त परत देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र ठरलेल्या कालावधीनंतर ना मूळ रक्कम परत मिळाली, ना नफ्याचे आश्वासन पूर्ण झाले. वारंवार पाठपुरावा करूनही समाधानकारक प्रतिसाद न मिळाल्याने अखेर खान यांनी पोलिसांकडे धाव घेतली.
दरम्यान, झाकिरुद्दीन सय्यद याच्यावर यापूर्वीही पुण्यातील ओतूर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल असल्याची माहिती समोर आली आहे. बांधकाम व्यावसायिक असलेल्या सय्यदवर पुण्यातील काही शेतकऱ्यांचीही फसवणूक केल्याचा आरोप असल्याचे सांगितले जात आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास जे. जे. मार्ग पोलीस करत असून, गुंतवणुकीच्या आमिषाला बळी पडू नये, असे आवाहन पोलिसांनी नागरिकांना केले आहे.