मुंबई : नीती आयोगाने मुंबई महानगर प्रदेशाच्या विकासातून सुमारे १.५ ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था निर्माण करण्याची क्षमता व्यक्त केली आहे. या क्षमतेचा प्रभावी उपयोग करून मुंबई महानगर प्रदेशाचा नियोजित, शाश्वत आणि जागतिक दर्जाचा विकास करण्यासाठी राज्य शासनाने आंतरराष्ट्रीय संस्थांसोबत भागीदारी करण्यास सुरुवात केली आहे. यातून तिसऱ्या मुंबईच्या विकासाला गती मिळणार असल्याचा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे व्यक्त केला. मुंबई ३.० साठी ३२४ चौ. किमीचा मास्टर प्लॅन असल्याचेही ते म्हणाले.
सह्याद्री अतिथिगृह येथे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत एमएमआरडीए आणि टेमासेक सुरबाना जुरोंग व मॅपलट्री, सिंगापूर यांच्यात सामंजस्य करार करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. मुख्यमंत्री फडणवीस यांनी या भागीदारीचे स्वागत करताना सांगितले की, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, अटल सेतू आणि मुंबई महानगर प्रदेशातील विविध पायाभूत सुविधा प्रकल्पांमुळे रायगड परिसराच्या विकासाला मोठी चालना मिळत आहे. या पार्श्वभूमीवर रायगड-पेण ग्रोथ सेंटर आणि ‘थर्ड मुंबई’ अर्थात मुंबई ३.० च्या विकासासाठी सिंगापूरमधील नामांकित संस्था व आंतरराष्ट्रीय गुंतवणूकदारांसोबत करण्यात आलेले करार महत्त्वपूर्ण ठरणार आहेत.
मुंबई महानगर प्रदेशाच्या विस्तारासोबत भविष्यात तिसरी मुंबई आणि चौथी मुंबई या नव्या विकासकेंद्रांचा उदय होणार आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, अटल सेतू, रायगड-पेण ग्रोथ सेंटर आणि एमएमआरमधील प्रस्तावित विकास केंद्रांची एकात्मिक सांगड घालून भविष्यातील आर्थिक विकासासाठी सक्षम परिसंस्था निर्माण करण्याचे शासनाचे उद्दिष्ट आहे. या माध्यमातून मुंबई महानगर प्रदेशाचा नियोजित विस्तार, रोजगाराच्या संधी, गुंतवणूक, उद्योग आणि आधुनिक नागरी सुविधांचा विकास साधला जाणार आहे, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.
रायगड पेण ग्रोथ सेंटर लिमिटेड आणि मॅपलट्री यांच्यात १०० एकरांच्या मिश्र वापर विकास प्रकल्पासाठी सामंजस्य करार करण्यात आले. या प्रकल्पामध्ये मॅपलट्रीकडून विकासासाठी आवश्यक भांडवली व कार्यकारी भांडवल गुंतवणूक, मूल्यनिर्मिती, देश-विदेशातील गुंतवणूकदार आणि जागतिक कंपन्यांना आकर्षित करण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. या व्यवहारातून रायगड-पेण ग्रोथ सेंटरमध्ये १.१ अब्ज अमेरिकन डॉलरपेक्षा अधिक परकीय थेट गुंतवणूक येण्याची अपेक्षा आहे.