Mumbai Local Train Pudhari
मुंबई

Mumbai Local Train: मृत्यूचे आकडे चिंताजनक, लवकरात लवकर लोकल ट्रेनला स्वयंचलित दरवाजे बसवा - मुंबई हायकोर्ट

Bombay High Court On Mumbai Local Train Accident: उच्च न्यायालयाच्या सूचना, पडून प्रवाशांचा मृत्यू होतोय हे चिंताजनक

पुढारी वृत्तसेवा

Bombay High Court On Mumbai Local Train Accident:

मुंबई : मध्य रेल्वे मार्गावरील लोकल ट्रेनच्या दरवाजातून प्रवासी खाली पडण्याचे प्रमाण गंभीर असून मृत्यूंचे आकडे चिंताजनक आहेत. या जीवघेण्या अपघाताचे सत्र रोखण्यासाठी लोकल ट्रेनला लवकरात लवकर स्वयंचलित दरवाजे बसवा, अशी महत्त्वपूर्ण सूचना शुक्रवारी उच्च न्यायालयाने रेल्वे प्रशासनाला दिली.

9 जून रोजी मुंब्रा रेल्वे स्थानकाजवळ सीएसएमटीच्या दिशेने जाणार्‍या लोकल ट्रेनच्या दरवाजातून 13 प्रवासी खाली पडले. त्यातील चार प्रवाशांचा जागीच मृत्यू होता. या पाशर्वभूमीवर उपनगरीय रेल्वे मार्गावरील वाढत्या अपघातांबाबत जनहित याचिका उच्च न्यायालयात दाखल झाली आहे. त्यावर मुख्य न्यायमूर्ती आलोक आराधे आणि न्यायमूर्ती संदीप मारणे यांच्या खंडपीठापुढे शुक्रवारी सुनावणी झाली.

यावेळी खंडपीठाने मुंब्रा अपघाताच्या घटनेवर तीव्र चिंता व्यक्त केली. तुम्ही जे काही उपाय केले आहेत ते पुरेसे नाहीत, असे दिसते. धावत्या गाड्यांमधून पडून लोक मरत आहेत. दररोज सुमारे 10 प्रवासी अपघातात मरतात. तुमच्या स्वतःच्या आकडेवारीवरून हे स्पष्ट होत आहे. ही परिस्थिती चिंताजनक आहे, अशी टिप्पणी न्यायमूर्ती मारणे यांनी यावेळी केली. तर आम्हाला फक्त एवढेच वाटते की, भविष्यात अशी घटना पुन्हा घडू नयेत. हे खूप चिंताजनक आहे, असे मत मुख्य न्यायमूर्ती आराधे यांनी व्यक्त केले.

रेल्वेकडून बाजू मांडताना अतिरिक्त सॉलिसिटर जनरल अनिल सिंग यांनी, वेळोवेळी प्रतिबंधात्मक पावले उचलण्यात आली आहेत आणि 9 जूनच्या घटनेनंतर वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्तांच्या नेतृत्वाखाली समिती स्थापन करण्यात आली आहे. अहवालाची वाट पाहत असल्याचे स्पष्ट केले.

अतिक्रमण रोखण्यासाठी ट्रॅक डिव्हायडर बसवणे, फूटबोर्ड आणि प्लॅटफॉर्ममधील अंतर कमी करणे आणि प्लॅटफॉर्मवरील गर्दी कमी करण्यासाठी अन्न आणि पुस्तकांचे स्टॉल हटवणे अशा विविध उपाययोजनांकडे त्यांनी न्यायालयाचे लक्ष वेधले. तथापि खंडपीठाने त्यावर असमाधान व्यक्त केले आणि लवकरात लवकर लोकल ट्रेनना स्वयंचलित दरवाजे बसवण्याची सूचना केली. त्यासाठी रेल्वेला मुदत देत खंडपीठाने सुनावणी तहकूब केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT