INS Nipun Pudhari
मुंबई

INS Nipun: भारतीय नौदलाच्या ताफ्यात ‘आयएनएस निपुण’ दाखल; खोल समुद्रातील मोहिमांना मिळणार मोठे बळ

गेल्या वर्षी दाखल झालेल्या ‘आयएनएस निस्तार’नंतर या श्रेणीतील हे दुसरे विशेष जहाज आहे.

पुढारी वृत्तसेवा

मुंबई: भारतीय नौदलाच्या सामर्थ्यात सोमवारी मोठी भर पडली. समुद्राच्या अथांग खोलीत जटिल मोहिमा राबवण्यासाठी सज्ज असलेले अत्याधुनिक ‘आयएनएस निपुण’ हे जहाज नौदलात औपचारिकरीत्या दाखल झाले.

नौदल प्रमुख ॲडमिरल कृष्णा स्वामीनाथन यांच्या उपस्थितीत मुंबईत हा शानदार कमिशनिंग सोहळा पार पडला. गेल्या वर्षी दाखल झालेल्या ‘आयएनएस निस्तार’नंतर या श्रेणीतील हे दुसरे विशेष जहाज आहे.

आयएनएस निपुण हे जहाज नौदलाच्या खोल समुद्रातील डायव्हिंग, पाणबुडी बचाव (सबमरिन रेस्क्यू), पाण्याखालील हस्तक्षेप आणि बचाव मोहिमांची क्षमता लक्षणीयरीत्या वाढवते. हे जहाज ३०० मीटर खोलीपर्यंत डायव्हिंग मोहिमा पार पाडण्यास सक्षम आहे. याशिवाय आपत्ती व्यवस्थापन आणि मानवतावादी मदत कार्यासाठीही याचा प्रभावी वापर केला जाऊ शकतो.

सागरी सहकार्यात भारताचे वाढते स्थान

‘फार बिनीथ, फ्यू बियाँड’ हे या जहाजाचे ब्रीदवाक्य असून ते समुद्राच्या आव्हानात्मक खोलीत काम करणाऱ्या जवानांचे धैर्य दर्शवते. नौदल प्रमुख ॲडमिरल कृष्णा स्वामीनाथन म्हणाले की, डीप सबमर्जन्स रेस्क्यू व्हेईकल वाहून नेण्याची क्षमता असल्यामुळे भारत स्वतःच्या तसेच मित्र देशांच्या संकटात सापडलेल्या पाणबुड्यांच्या मदतीसाठी सज्ज झाला आहे. यामुळे भारत या प्रदेशातील विश्वासार्ह ‘सबमरीन रेस्क्यू पार्टनर’ म्हणून उदयास येईल.

स्वदेशी बनावट आणितांत्रिक वैशिष्ट्ये

हिंदुस्तान शिपयार्ड लिमिटेड (विशाखापट्टणम) द्वारे संपूर्णपणे स्वदेशी तंत्रज्ञानाने डिझाईन निर्मिती.

हे जहाज ११९.४ मीटर लांब असून त्याचे वजन सुमारे १०,५०० टन आहे.

सॅच्युरेशन, एअर आणि हेलिओक्स डायव्हिंग प्रणालींसह सुसज्ज.

यात अत्याधुनिक ‘रिमोटली ऑपरेटेड व्हेईकल्स’, अत्याधुनिक वैद्यकीय सुविधा उपलब्ध.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT