नवी मुंबई ः दुर्मिळ सोनेरी कोल्हा दोन दिवसांपूर्वी घणसोलीतील सिडकोच्या मेघमल्हार गृहसंकुलात आला होता. एका सजग नागरिकाने त्याचे चित्रण केल्याने हा प्रकार समोर आला आहे. मात्र हा कोल्हा जखमी अवस्थेत असल्याने तो नागरिकांवर हल्ला करण्याची भिती व्यक्त आहे. दरम्यान याबाबत वनविभागाला माहिती दिल्यानंतर त्यांनी प्रत्यक्षस्थळी भेट देत पिंजरा लावला आहे.
घणसोली पामबीच रस्त्यालगतच्या खाडी परिसरात यापूर्वीही कोल्हे दिसल्याच्या घटना नोंदल्या गेल्या आहेत. परंतु, आता हा प्राणी थेट दाट लोकवस्तीत दिसल्याने चिंता व्यक्त होत आहे. तज्ज्ञांच्या मते, खाडीकिनारी आणि मोकळ्या जागांमधील नैसर्गिक अधिवास कमी होत असल्याने हे प्राणी अन्नाच्या शोधात शहरी भागाकडे वळत आहेत. तसेच कचऱ्याच्या ढिगांमध्ये मिळणारे उरलेले अन्न, मोकळ्या जागेत टाकली जाणारी खाद्यपदार्थांची पॅकेट्स यामुळेही वन्यप्राणी आकर्षित होत आहेत.
कोल्हा माणसांवर हल्ला करीत नाही असे स्पष्ट करीत वनविभागाने रहिवाशांना काही सूचना केल्या आहेत. प्रसंगी घाबरून पळापळ न करता प्राण्यापासून अंतर ठेवावे, त्याच्या जवळ जाण्याचा किंवा हाकलण्याचा प्रयत्न करू नये तसेच कचरा मोकळ्या जागेत टाकू नये.
सुरक्षा जाळीची मागणी
या ग्रहसंकुलालगत खारफुटीचे जंगल आहे. त्यामुळे सरपटणाऱ्या प्राण्यांचा संकुलात वावर असतो. आता कोल्हाही दिल्याने सोसायेटीचे अध्यक्ष तुषार नाईक, कार्याध्यक्ष बाळासाहेब ढाले, सदस्य विनोद रटाटे, माउली शिरसाट यांनी वनमंत्री गणेश नाईक यांची भेट घेत याबाबत कल्पना दिली. खारपुटी जंगलालगत असलेल्या संकुलाच्या भिंतीला सुरक्षा जाळी लावण्याची मागणी केली आहे. नाईक यांनी संकुलात वनविभागाला अशी कामे करता येत नाहीत, मात्र यावर तोडगा काढण्याचे आश्वासन कमिटीला दिले आहे.