IASV Triveni Pudhari
मुंबई

IASV Triveni: ३१४ दिवस...२५,५०० सागरी मैल! लष्करी महिला अधिकाऱ्यांची ऐतिहासिक ‘समुद्र प्रदक्षिणा’ फत्ते

अथांग सागरावर भारताची नारीशक्ती

पुढारी वृत्तसेवा

मुंबई: भारतीय भूदल, नौदल आणि वायुसेनेच्या नऊ महिला अधिकाऱ्यांनी 'आयएएसव्ही त्रिवेणी' या स्वदेशी नौकेवरून पृथ्वी प्रदक्षिणा मारण्याचा अभूतपूर्व विक्रम केला आहे. ३१४ दिवसांच्या खडतर आणि ऐतिहासिक प्रवासानंतर या वीरांगनांचे मुंबईतील गेटवे ऑफ इंडिया येथे जल्लोषात स्वागत करण्यात आले.

अथांग सागरावर भारताची नारीशक्ती

लेफ्टनंट कर्नल अनुजा वरुडकर यांच्या नेतृत्वाखालील या मोहिमेत २५,५०० सागरी मैलांचे अंतर पार करण्यात आले. 'आयएएसव्ही त्रिवेणी'ने चार महासागर पार करत आणि दोनदा विषुववृत्त ओलांडून तिन्ही 'ग्रेट केप्स' (केप लीविन, केप हॉर्न आणि केप ऑफ गुड होप) ला प्रदक्षिणा घातली. या मोहिमेदरम्यान भारतीय महिला अधिकाऱ्यांनी ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, अर्जेंटिना आणि दक्षिण आफ्रिका या देशांमध्ये महत्त्वपूर्ण राजनैतिक भेटही दिली.

केवळ प्रवास न करता या महिला अधिकाऱ्यांनी नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओशनोग्राफीच्या सहकार्याने सागरी पर्यावरणावर महत्त्वपूर्ण संशोधन केले. महासागरातील सूक्ष्म प्लास्टिकचा अभ्यास करणे आणि सागरी जीवांचे दस्तऐवजीकरण करून सागरी आरोग्याबद्दल जनजागृती करण्याचे महत्त्वाचे कार्य या टीमने केले.

संकटांवर मात अन्‌ अतूट जिद्द

या प्रवासात महिला अधिकाऱ्यांना अनेक गंभीर आव्हानांना सामोरे जावे लागले. तस्मानियाजवळ वादळी वाऱ्यामुळे शीड फाटले आणि इंजिनमध्ये पाणी शिरल्याने तांत्रिक बिघाड झाला; तर केप टाऊनच्या मार्गावर दिशादर्शक यंत्रणा बंद पडली होती. अशा वेळी सैन्य दलातील कठोर प्रशिक्षण, परस्परांवरील विश्वास आणि शिस्तीच्या बळावर या पथकाने निसर्गाच्या कोपावर मात करत सुरक्षित वाट काढली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT