Indian Pitta bird Pudhari
मुंबई

Indian Pitta bird: पावसाचे संकेत देणारा ‌‘इंडियन पिट्टा‌’ रायगडमध्ये; कर्नाळा जंगलात घुमतोय आवाज

पक्षीप्रेमींमध्ये उत्साह, पर्यटकांमध्ये विशेष आकर्षण

पुढारी वृत्तसेवा

राजेश डांगळे

पनवेल शहर: मान्सूनपूर्व काळात पावसाचे संकेत देणारा प्रसिद्ध ‌‘इंडियन पिट्टा‌’ अर्थात नवरंग पक्षी कर्नाळा परिसरात दाखल झाला आहे. नवरंगच्या आगमनामुळे निसर्गप्रेमी आणि पक्षी अभ्यासकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

रंगीबेरंगी पिसे आणि मधुर आवाजासाठी ओळखला जाणारा हा पक्षी दरवर्षी उन्हाळ्याच्या अखेरीस कर्नाळा जंगल परिसरात दिसून येतो. यंदाही त्याचे आगमन झाल्याने पावसाची चाहूल लागल्याची चर्चा सुरू झाली आहे.

पनवेल येथील पक्षी अभ्यासक व निरीक्षक माधव आठवले तसेच पक्षी अभ्यासक समाधान पवार यांनी कर्नाळा परिसरात इंडियन पिट्टाचे निरीक्षण केले असून गेल्या काही दिवसांपासून पहाटे व संध्याकाळच्या वेळेत त्याचा आवाज ऐकू येत असल्याची माहिती त्यांनी दिली.

जंगलातील ओलसर भाग, झाडाझुडपे आणि पानगळ झालेल्या परिसरात हा पक्षी प्रामुख्याने अन्न शोधताना दिसत असल्याचे त्यांनी सांगितले. पक्षी निरीक्षक समाधान पवार नेहमी या परिसरातील विविध पक्ष्यांचा सखोल अभ्यास करत असतात, त्यांचे अस्तिव कसे जपले जाईल त्याची काळजी घेतात.

नवरंग हा पक्षी रात्री जरी झाडावर रहात असला तरी दिवसा यांचा वावर जमिनीवरच जास्त असतो. दाट जंगलांमधे हा पक्षी पटकन दिसण्यापेक्षा याचे ओरडणेच लवकर ऐकू येते. अतिशय लांब दुहेरी असणारा हा आवाज “व्हिट ट्यू“ किंवा “व्हिट व्यू“ असा असतो. यांचा विणीचा हंगाम हा पावसाळ्यात असून साधारणत: जून ते ऑगस्ट महिन्यापर्यंत हे घरटी बनवून अंडी देतात.

जुन्या नोंदींप्रमाणे हे पक्षी हिमालयाच्या पायथ्याशी असणाऱ्या जंगलांमध्ये घरटी करायचे. पण सध्या झालेल्या अभ्यासानुसार हे अगदी गोव्यापर्यंतसुद्धा घरटी करताना आढळले आहेत. यांचे घरटे गोलाकार असते. ते सहसा गवतापासून आणि काटक्यांपासून बनवलेले असते. सहसा ते जमिनीवर किंवा झुडुपामधे अगदी खालच्या पातळीवर असते.

दरवर्षी एप्रिल-मे महिन्यात शेतकरी खरीप हंगामासाठी शेतीची मशागत करतात. त्यानंतर पावसाच्या प्रतीक्षेत असताना नवरंग पक्षी दिसल्यास पाऊस येणार असल्याचा अंदाज शेतकरी वर्तवतात. पेरणीच्या हंगाम ठरवून पेरणी केली जाते.

श्रीलंकेपर्यंत प्रवास

हा पक्षी हिवाळ्यात दक्षिण भारत आणि श्रीलंकेत स्थलांतर करतो, तर पावसाळ्याच्या तोंंडावर अगदी हिमालयाच्या पायथ्यापर्यंतही प्रजननाकरिता जातो. एप्रिल महिन्यात श्रीलंका आणि दक्षिण भारतात स्थलांतर केलेले नवरंग पक्षी पश्चिम घाटाच्या धारेला धरुनच उत्तरेकडे सरकू लागतात. मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात नवरंग पक्षी कोकणात दाखल होतो. पश्चिम घाटामार्गे स्थलांतर करणारे 90 टक्के नवरंग पक्षी हे गुजरात किंवा त्यावरील भागात जाऊन प्रजनन करत असले तरी, काही पक्षी हे कोकणात देखील घरटी बांधतात असे अभ्यासकांचे निरीक्षण आहे.

नवरंग नाव का

इंग्रजीमधे याला इंडियन पिट्टा असे म्हणतात तर मराठीत याला नवरंग म्हणतात. याचा आकार साधारणत: मैने एवढा असतो पण ह्याची शेपुट एकदम आखुड असते किंवा जवळपास नसतेच. चोचीपासून मागे डोळ्यावर अगदी मानेपर्यंत काळी गडद पट्टी असते. पंख गडद हिरवे असून त्यावर एक आकाशी निळा ठिपका दिसतो.

उडताना या हिरव्या, निळ्या रंगाच्या अजुन थोड्या छटा दिसतात. गळ्याखाली पांढरा रंग असतो तर शेपटीखाली आणि पोटाच्या शेवटी जर्द लाल रंग दिसतो. एवढा हा रंगीबेरंगी पक्षी असल्यामुळेच ह्याचे नाव नवरंग सार्थ ठरते. तर पिट्टा हा शब्द तेलुगू भाषेतून आला आहे. ज्याचा अर्थ लहान पक्षी असा होतो.

हिरवा, निळा, पिवळा आणि तपकिरी रंगांच्या मिश्रणामुळे इंडियन पिट्टा हा पक्षी पर्यटकांचे विशेष आकर्षण ठरत आहे. कर्नाळा अभयारण्यात येणारे पक्षीप्रेमी या पक्ष्याचे छायाचित्र टिपण्यासाठी गर्दी करताना दिसत आहेत. दरम्यान, जंगल परिसरात शांतता राखावी, प्लास्टिक व कचरा टाकू नये तसेच पक्ष्यांच्या अधिवासाला त्रास होणार नाही याची काळजी घ्यावी.
- माधव आठवले पक्षी अभ्यासक, पनवेल

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT