मुंबई : दिल्ली, मुंबई, पुण्यासह देशातील 7 महानगरांमध्ये एप्रिल ते सप्टेंबर या सहामाहीत 1 लाख 93 हजार घरांची विक्री झाली आहे. तर, गृहक्षेत्राची उलाढाल 2 लाख 98 हजार कोटी रुपयांवर गेली आहे. मुंबई आणि पुण्यात मिळून 93 हजार 570 घरांची विक्री झाली आहे.
गत आर्थिक वर्षात (2024-25) नवी दिल्ली, मुंबई, पुणे, कोलकाता, चेन्नई, बंगळूर आणि हैदराबादमध्ये 4 लाख 22 हजार 765 घरांची विक्री झाली होती. तर, 5 लाख 59 हजार कोटी रुपयांची उलाढाल झाली होती. मुंबई महानगरात एप्रिल ते सप्टेंबर-2025 या कालावधीत 61 हजार 540 सदनिकांची विक्री झाली असून, उलाढाल एक लाख कोटी रुपयांवर गेली आहे. तर, आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये 1 लाख 44 हजार घरांच्या विक्रीतून 2 लाख 23 हजार 220 कोटी रुपयांची उलाढाल झाली होती.
पुण्यात एप्रिल ते सप्टेंबर या कालावधीत 32 हजार 30 घरांची विक्री झाली असून, 30 हजार 324 कोटी रुपयांची उलाढाल झाली आहे. गत आर्थिक वर्षात पुण्यात 74 हजार 200 घरांच्या विक्रीतून 66 हजार 58 कोटी रुपयांची उलाढाल झाली होती. आर्थिक वर्ष 2022 पासूनचा हा उच्चांकी आकडा होता. बांधकाम विश्लेषक संस्था ‘ॲनारॉक रिसर्च’च्या ताज्या अहवालात ही माहिती देण्यात आली आहे. चालू आर्थिक वर्षात देशातील 7 महानगरांत झालेल्या एकूण सदनिका विक्रीतील 48 टक्के वाटा एकट्या पुणे आणि मुंबईचा आहे.
उलाढाल 6.65 लाख कोटींवर
चालू आर्थिक वर्षात (2025-26) गृह क्षेत्राची उलाढाल 6.65 लाख कोटी रुपयांवर जाईल, असा अंदाज आहे. एप्रिल ते सप्टेंबर या पहिल्या सहामाहीत 2.98 लाख कोटी रुपयांची उलाढाल झाली आहे. गतवर्षीच्या 53 टक्के उलाढाल आताच झाल्याने यंदा उलाढाल वाढेल, असे भाकीत ‘ॲनारॉक रिसर्च’ने केले आहे. लक्झरी आणि सुपर लक्झरी घरांच्या विक्रीत वाढ झाल्याने उलाढाल वाढत असल्याचे निरीक्षणही अहवालात नोंदविण्यात आले आहे.