मुंबई : शनिवार संध्याकाळपासून भारत-पाकचा शस्त्रसंधी करार जाहीर झाला असला तरी पाकिस्तान भारतात दहशतवादी हल्ले घडवण्याचे कारनामे करण्याच्या शक्यता गृहीत धरून मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्र सतर्क झाला असून, खासकरून मुंबईत नौदलाला हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे.
मुंबईच्या समुद्रात नौदलाने आपली लढाऊ जहाजे तैनात केली असून, खोल समुद्रात मासेमारीसाठी जाणार्या मच्छीमारांच्या प्रत्येक बोटीवर नजर ठेवली जात आहे. मुंबई हाय हा संवेदनशील परिसर मानला जातो. इथल्या तेल विहिरींभोवती सतत गस्त घातली जात आहे. नाव प्रसिद्ध न करण्याच्या अटीवर नौदलाच्या एका अधिकार्याने सांगितले की, संपूर्ण मुंबई किनारपट्टीवर हाय अलर्ट जारी केलेला आहे.
उत्तरेकडील तसेच अरेबियन जहाजांचा ताफा तैनात करण्यात आला आहे. मच्छीमारांच्या बोटींवर सतत नजर ठेवली जात असून, मच्छीमारांनाही एकूण परिस्थितीची जाणीव करून देण्यात आली आहे. शंकास्पद हालचाल दिसल्यास त्यांनी तत्काळ कुठे सूचना द्यायची हे सांगण्यात आले आहे.
2008 साली मुंबईवर पाकिस्तानी दहशतवादी समुद्रातूनच चाल करून आले होते. त्यामुळेच मुंबईच्या समुद्रात रोज किती बोटी उतरतात, किती काळ समुद्रात असतात, त्यावर किती मच्छीमार, खलाशी असतात याची रोजच्या रोज नोंद ठेवली जात आहे. काही दिवसांपूर्वीच मुंबईचे नौदल अधिकारी आणि मत्स्य उत्पादन विभागाचे आयुक्त तसेच अधिकारी यांची बैठक झाली. मत्स्य उत्पादन विभागाने या बोटींची, बोटींच्या मालकांची आणि मच्छीमारांची रोज नोंद ठेवण्यास सांगण्यात आले आहे. मच्छीमार बोटींनी मुंबई हाय परिसरापासून सुरक्षित अंतरावर राहण्याच्या खास सूचना देण्यात आल्या आहेत.
26/11 चा हल्ला लक्षात ठेवून नौदल कोणताही धोका पत्करण्यास तयार नाही. त्यावेळी अजमल कसाबसह नऊ अतिरेकी एक साधी मच्छीमार बोट घेऊनच मुंबईच्या किनार्यावर उतरले होते व त्यांनी आजवरचा सर्वांत भीषण दहशतवादी हल्ला मुंबईवर चढवला होता. त्यामुळेच समुद्रातील एकूण एक बोटींची नोंद रोज घेतली जाईल याची खबरदारी घेतली जात आहे.