मुंबई: सुवर्ण तारण कर्जाचा आकार 2022 मधील पहिल्या तिमाहीत 90 हजार रुपये होता. त्यात 2025 च्या चौथ्या तिमाहीत 1.96 लाख रुपयांपर्यंत वाढ झाली आहे. ट्रान्सयुनियन सिबिलच्या गोल्ड लोन लँडस्केप अहवालातून ही माहितीसमोर आली आहे.
देशात सुवर्ण तारण कर्ज वेगाने वाढ होत असून, शिल्लक कर्ज वाट्याच्या आधारावर भारतातील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे किरकोळ कर्ज उत्पादन बनले आहे. ट्रान्सयुनियन सिबिलच्या अहवालानुसार मार्च 2022 पासून सुवर्ण तारण शिल्लक 3.8 पट वाढली असून, डिसेंबर 2025 पर्यंत किरकोळ कर्जवितरणातील त्यांचा वाटा 5.9 वरून 11.1 टक्क्यांपर्यंत वाढला आहे. विशेषतः नॉन बँकिंग फायनान्स कंपन्यांची (एनबीएफसी) कामगिरी चांगली राहिली आहे.
मार्च 2022 मधील 7 वरून डिसेंबर 2025 मध्ये एनबीएफसीचा एकूण कर्जातील वाटा 11 टक्क्यांपर्यंत वाढला आहे. तसेच सार्वजनिक क्षेत्रातील बँकांनी याच कालावधीत 57 वरून 62 टक्क्यांपर्यंत वाढ नोंदविली आहे. प्रत्येक खात्यावरील सरासरी सुवर्ण तारण कर्ज रकमेची शिल्लक मार्च 2022 मधील 1.1 वरून डिसेंबर 2025 मध्ये 1.9 लाख रुपयांपर्यंत वाढली आहे. सुवर्ण तारण कर्ज 2.5 लाख रुपयांपेक्षा जास्त असलेल्या कर्जदारांचे प्रमाण 2025 अखेरीस 14 टक्के झाले आहे. हेच प्रमाण 2022 मध्ये 10 टक्के होते.
ट्रान्सयुनियन सिबिलचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी भावेश जैन म्हणाले, भारतामध्ये सोने नेहमीच आर्थिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या महत्त्वाचे राहिले आहे. मात्र, आता सुलभ आणि सुरक्षित कर्ज म्हणून सुवर्ण तारण कर्जाचे प्रमाण वाढत आहे.
महिलांचे प्रमाण वाढले...
सुवर्ण तारण कर्जात महिलांचा वाटा 2022 मधील 36 वरून 2025 अखेरीस 39 टक्क्यांवर गेला आहे. दक्षिण भारतातील बाजारपेठांबरोबरच पश्चिम आणि उत्तरेकडील राज्यांमध्येही सुवर्ण तारण कर्जात चांगली वाढ दिसून येत आहे. तेलंगणा, उत्तर प्रदेश, राजस्थान, गुजरात, महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश या राज्यांमध्ये महिला कर्जदारांमध्ये उल्लेखनीय वाढ दिसून आली आहे.