मुंबई : दुर्गम भागातील लोकांना मोठ्या शहरात जाऊनच विविध आजारांवर शस्त्रक्रिया करावी लागत होती. अनेक वेळा वेळेत शस्त्रक्रिया न झाल्याने आपले प्राण गमावावे लागत होते. मात्र त्यावर उपाय म्हणून एसएस इनोव्हेशन्सने भारतातील पहिली मोबाइल टेली-रोबोटिक सर्जरी युनिट म्हणजे टेलीसर्जरी ऑन व्हील्स डिझाइन केली असून दुर्गम भागात जाऊन टेली रोबोटिक शस्त्रक्रिया करणार आहे.
भारतातील पहिल्या मोबाइल टेली-रोबोटिक सर्जरी युनिटचे अनावरण नवी दिल्लीत करण्यात आले. याप्रसंगी एसएस इनोव्हेशन्सचे संस्थापक, अध्यक्ष डॉ. सुधीर श्रीवास्तव म्हणाले की, एसएसआय मंत्राम हे केवळ एक मोबाइल टेलिसर्जिकल युनिट नाही, तर ते जागतिक दर्जाच्या आरोग्यसेवेचे लोकशाहीकरण आणि विकेंद्रीकरण करण्याच्या दिशेने एक चळवळ आहे. टेलि-सर्जिकल प्रक्रियांव्यतिरिक्त, एसएसआय मंत्राम सर्जिकल शिक्षण, टेलि-मेंटरिंग आणि रिअल टाइम रुग्ण डेटा विश्लेषणासाठी एक शक्तिशाली व्यासपीठ म्हणून काम करते. सतत संशोधन आणि नवोपक्रमासह, एसएसआय प्रगत रोबोटिक शस्त्रक्रिया ज्यांना सर्वात जास्त गरज आहे त्यांच्यापर्यंत पोहोचेल याची खात्री करण्यासाठी एक मोठे पाऊल उचलत असल्याचे यावेळी डॉ. श्रीवास्तव म्हणाले.
दुर्गम भागात सेवा देण्यासाठी डिझाइन केलेले एस एसआय मंत्राम बॅकअप पॉवर सिस्टमसह सुसज्ज आहे. तसेच हाय-स्पीड टेलिकम्युनिकेशन सिस्टम आणि सॅटेलाइट कनेक्टिव्हिटीमध्ये चालू असलेल्या संशोधन आणि विकासासह, युनिटमध्ये अगदी दुर्गम भागात देखील दूरस्थ टेलिरोबोटिक शस्त्रक्रिया सुलभ होणार आहे.