India Europe FTA Pudhari
मुंबई

India Europe FTA: भारत-युरोप एफटीएच्या यशात महाराष्ट्राची प्रमुख भूमिका:मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

भारत-बेल्जियम भागीदारीमुळे जागतिक व्यापाराला नवी दिशा : बेल्जियमचे प्रधानमंत्री बार्ट डी वेव्हर

पुढारी वृत्तसेवा

मुंबई: भारत-युरोपियन युनियन यांच्यातील मुक्त व्यापार करार (एफटीए) हा केवळ शुल्क, नियम आणि बाजारपेठेतील प्रवेशापुरता मर्यादित नाही, तर परस्पर विश्वासावर आधारित व्यापक भागीदारीचा करार आहे.

यातून निर्माण होणाऱ्या संधींचे आर्थिक परिणामांमध्ये रूपांतर करण्यासाठी महाराष्ट्र सज्ज आहे. या कराराच्या यशात महाराष्ट्र प्रमुख भागीदार ठरेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

तसेच महाराष्ट्र आणि बेल्जियम यांच्यातील आर्थिक भागीदारी अधिक व्यापक करण्यासाठी ‘मुंबई-अँटवर्प’ आर्थिक भागीदारी विकसित करण्याची संकल्पनाही मुख्यमंत्री फडणवीस यांनी मांडली.

भारत-युरोप एफटीएच्या पार्श्वभूमीवर आयोजित भारत-बेल्जियम उच्चस्तरीय संवाद कार्यक्रमात मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. याप्रसंगी बेल्जियमचे प्रधानमंत्री बार्ट डी वेव्हर, केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल, राज्याचे राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यावेळी उपस्थित होते.

महाराष्ट्र-बेल्जियम नैसर्गिक भागीदार

बेल्जियमकडे जागतिक दर्जाची बंदरे आणि लॉजिस्टिक्स व्यवस्था असून औषधनिर्माण, जैवतंत्रज्ञान, रसायने, यंत्रसामग्री, प्रगत उत्पादन, सेमीकंडक्टर संशोधन, हरित हायड्रोजन आणि स्वच्छ तंत्रज्ञान क्षेत्रातील क्षमता उल्लेखनीय आहे. महाराष्ट्राकडे मोठी बाजारपेठ, कुशल मनुष्यबळ आणि मजबूत औद्योगिक परिसंस्था आहे. त्यामुळे बेल्जियम आणि महाराष्ट्र हे नैसर्गिक भागीदार असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

पाच क्षेत्रांमध्ये सहकार्याच्या संधी

बेल्जियम-महाराष्ट्र सहकार्यासाठी प्रगत उत्पादन आणि हरित उद्योग, सेमीकंडक्टर व इलेक्ट्रॉनिक्स, स्वच्छ ऊर्जा, औषधनिर्माण व जैवतंत्रज्ञान तसेच बंदरे, लॉजिस्टिक्स आणि दळणवळण या पाच क्षेत्रांत मोठ्या संधी असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी नमूद केले. बेल्जियममधील अँटवर्प हे जगातील प्रमुख हिरे व्यापार केंद्र असून मुंबईतील भारत डायमंड बोर्स हे भारताच्या हिरे व्यापाराचे केंद्र आहे.

हिरे व्यापाराबरोबरच वित्त, बंदरे, लॉजिस्टिक्स, तंत्रज्ञान, नवोन्मेष आणि शाश्वत विकास क्षेत्रांतही मुंबई-अँटवर्प आर्थिक भागीदारी विकसित करता येईल. यासाठी दोन्ही देशांतील शासन, बंदर प्राधिकरणे, वाणिज्य मंडळे आणि उद्योगांच्या सहभागातून औपचारिक व्यवस्था उभारण्याचा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांनी मांडला.

समन्वयासाठी स्वतंत्र टीम तयार करणार

भारत-बेल्जियम गुंतवणूक जलदगती यंत्रणेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील निवडक महत्त्वाकांक्षी प्रकल्प निश्चित करून त्यांची वेगाने अंमलबजावणी करण्यात येईल. त्यासाठी महाराष्ट्र शासन बेल्जियममधील संबंधित संस्था आणि उद्योगांशी समन्वय साधण्यासाठी स्वतंत्र पथक नियुक्त करेल, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी जाहीर केले.

उद्योग, बंदरे, औषधनिर्मिती आणि हरित ऊर्जेला मोठी संधी : बेल्जियमचे प्रधानमंत्री बार्ट डी वेव्हर भारत आणि युरोपने परस्पर विश्वास, मुक्त व्यापार आणि धोरणात्मक भागीदारीचा मार्ग स्वीकारला आहे. या एफटीएतून सुमारे दोन अब्ज ग्राहकांची बाजारपेठ जोडली जाणार आहे.

जागतिक अर्थव्यवस्थेच्या एक चतुर्थांश भागाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या या भागीदारीमुळे व्यापार अधिक सक्षम, सुरक्षित आणि विश्वासार्ह होईल, असे प्रतिपादन बेल्जियमचे प्रधानमंत्री बार्ट डी वेव्हर यांनी यावेळी केले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाचे कौतुक करताना प्रधानमंत्री बार्ट डी वेव्हर म्हणाले की, प्रधानमंत्री मोदी यांचे विचार जगाला सकारात्मक कृतीसाठी प्रेरित करतात. ते दूरदर्शी आणि सुज्ञ नेतृत्व आहे. दिल्लीला भेट देणे हा सन्मान होता.

मुक्त व्यापार करारामुळे सर्व क्षेत्रांना संधी : केंद्रीय मंत्री पीयूष गोयल

भारत आणि युरोपातील सुमारे दोन अब्ज लोकसंख्या, जागतिक व्यापाराचा मोठा हिस्सा आणि विशाल बाजारपेठ परस्परांशी जोडली जाणार आहे. हा करार शेतकरी, मच्छीमार, सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग, स्टार्टअप, महिला उद्योजक, उत्पादक आणि सेवा क्षेत्रासाठी व्यापक संधी निर्माण करणारा आहे. दोन्ही बाजूंच्या संवेदनशील क्षेत्रांचे हित जपत हा परस्पर लाभाचा करार करण्यात आल्याचे मंत्री पीयूष गोयल यांनी सांगितले.

अमेरिका, चीनच्या धोरणांवर अप्रत्यक्ष कटाक्ष

जगात अनेकवेळा जागतिक व्यापारात अडथळे निर्माण करण्याचे, बाजार व्यापार-उदीम बंद पाडण्याची भाषा केली गेली, टेरिफ लादण्याचे निर्णय घेतले गेले. काहीजण अत्यंत मनमानी पद्धतीने असे निर्णय करतात.

सोमवारी एखादा निर्णय जाहीर करतात, बुधवारी तो निर्णय फिरवतात आणि शनिवार येईपर्यंत पुन्हा तोच निर्णय लागू करण्याची घोषणा करतात, असे विधान बेल्जियमचे पंतप्रधान बार्ट डी वेव्हर यांनी केले. तेव्हा उपस्थितांनी जोरदार टाळ्या वाजविल्या. त्यांचा सारा रोख हा अनुक्रमे अमेरिका आणि चीनकडे असल्याचे स्पष्ट झाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT