Pratap Sarnaik file photo
मुंबई

Illegal Parcel Transport: वारंवार अवैध पार्सल वाहतूक करणाऱ्यांचे परवाने रद्द होणार; परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा

भाजपचे शंकर जगताप यांनी राज्यातील खासगी वाहतूकदारांकडून अवैधरीत्या सुरू असलेल्या पार्सल सेवेबाबत प्रश्न उपस्थित केला होता.

पुढारी वृत्तसेवा

मुंबई: राज्यात खासगी वाहतूकदारांकडून अवैधरीत्या पार्सल वाहतूक करण्यात येत आहे. या अवैध पार्सल वाहतूक करणाऱ्या वाहन चालक आणि मालकांचे परवाने रद्द करणार असल्याची घोषणा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी मंगळवारी विधानसभेत केली.

भाजपचे शंकर जगताप यांनी राज्यातील खासगी वाहतूकदारांकडून अवैधरीत्या सुरू असलेल्या पार्सल सेवेबाबत प्रश्न उपस्थित केला होता.

सुनील प्रभू आणि भास्कर जाधव यांनीही उपप्रश्न केले. त्याला उत्तर देताना सरनाईक म्हणाले, राज्यात अनेक खासगी वाहतूकदारांकडून अवैधरीत्या पार्सल सेवा सुरू आहे. अशा प्रकरणात वारंवार दोषी आढळून येणाऱ्या चालक आणि मालकांविरोधात आता कडक कारवाई करण्याची सूचना केली आहे.

त्यानुसार पहिल्यांदा दोषी आढळल्यास सात ते दहा दिवस निलंबनाची, दुसऱ्यांदा दोषी आढळल्यास दहा ते पंधरा दिवस आणि त्यानंतर तिसऱ्यांदा दोषी आढळल्यास पंधरा ते तीस दिवस निलंबनाची कारवाई करण्यात येईल, त्यानंतर चौथ्यांदा दोषी आढळून आल्यास परवाना रद्द करण्यात येईल असेही ते म्हणाले.

चाकरमान्यांना फटका नाही

भास्कर जाधव यांनी गणेशोत्सव काळात खासगी बस चालकांकडून दरवाढ करून पिळवणूक केली जाते, याकडे लक्ष वेधले. त्यावर सरनाईक यांनी एसटी महामंडळाकडे एसटी बसेस कमी होत्या. त्यावेळी हा प्रश्न सातत्याने जाणवत होता. मात्र आता तशी परिस्थिती नाही, आम्ही ८ हजार नवीन बसेस घेतल्या आहेत. त्यामुळे ज्या ठिकाणी एसटी बसची मागणी केली जाईल तिथे दिली जाईल, असे सांगितले.

मुंबईतील महामार्गाच्या जवळ एमएमआरडीए आणि सार्वजनिक बांधकाम विभागाची जागा आहे, याठिकाणी जर एसटी आणि खासगी बसेसाठी थांबे तयार केले, तर महामार्गावरील वाहतूक कोंडीचा जटील बनलेला प्रश्न सुटेल, अशी सूचना सुनील प्रभू यांनी केली. त्याला सरनाईक यांनी याबाबत संबंधित प्रशासनाची चर्चा करू, असे सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT