Fake Call Center | मुलुंडमधील बेकायदा कॉल सेंटरचा पर्दाफाश 
मुंबई

Fake Call Center | मुलुंडमधील बेकायदा कॉल सेंटरचा पर्दाफाश

5 जणांना अटक, कर्जाच्या आमिषाने विदेशी नागरिकांना गंडा

पुढारी वृत्तसेवा

मुंबई : मुलुंडमधील एका अपार्टमेंटमध्ये सुरू असलेल्या बेकायदा कॉलसेंटरवर कारवाई करीत मुलुंड पोलिसांनी पाचजणांना अटक केली आहे. आरोपी कर्जाच्या आमिषाने विदेशी नागरिकांची फसवणूक करुन त्यांच्याकडून घेतलेल्या प्रोसेसिंग फीचा अपहार करीत होते.

सागर राजेश गुप्ता (वय 27, राहणार मुलुंड), अभिषेक सूर्यप्रकाश सिंग (28, मुलुंड), तन्मय कुमार रजनीश धाडसिंग (27, बिहार), शैलेश मनोहर शेट्टी (27, भाईंदर पूर्व), रोहन मोहम्मद अन्सारी (28, ठाणे) अशी आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी टाकलेल्या छाप्यादरम्यान दोन लॅपटॉप, अकरा मोबाईल फोन, दोन वाय-फाय राउटर आणि 76,000 रुपये रोख पोलिसांनी जप्त केले. कॉल सेंटर म्हणून वापरल्या जाणार्‍या या अपार्टमेंटला पोलीस अधिकार्‍यांनी सील केले आहे.

अमेरिका आणि कॅनडासारख्या श्रीमंत देशांमध्येही अनेक लोकांना त्यांच्या गरजांसाठी कर्जाची आवश्यकता असते. या गोष्टीचा फायदा घेऊन मुंबईत राहणार्‍या आरोपींनी याचा फायदा घेतला. मुलुंडमध्ये अनधिकृत आंतरराष्ट्रीय कॉल सेंटर उघडले आणि अमेरिकन कंपनीचे अधिकारी असल्याचे भासवून अमेरिका आणि कॅनडामधील लोकांची फसवणूक करण्यास सुरुवात केली. मुलुंड येथे काहीजण बोगस आंतरराष्ट्रीय कॉल सेंटरच्या माध्यमातून विदेशी नागरिकांची फसवणूक करत असल्याची माहिती मुलुंड पोलिसांना मिळाली होती.

या माहितीची शहानिशा करण्यासाठी वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय जोशी यांच्या पथकातील पोलीस निरीक्षक शिवाजी चव्हाण, एपीआय सुनिल करांडे, मनोज पाटील, उपनिरीक्षक शिवानंद आपुणे, पोलीस अंमलदार उरणकर, आव्हाड, विंचू, कट्टे, ढेबे, बनसोडे, पवार यांनी मुलुंड कॉलनीतील एका निवासी इमारतीच्या फ्लॅटमध्ये छापा टाकत पाच जणांना अटक केली. त्यांची पोलिसांकडून चौकशी सुरू असून या चौकशीतून अनेक धक्कादायक खुलासे बाहेर येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. गेल्या महिन्यात, छत्रपती संभाजीनगरमधील पोलिसांनी अशाच एका रॅकेटचा पर्दाफाश केला होता. यामध्ये पेपल कर्ज आणि कर भरपाईचे आमिष दाखवून अमेरिकन नागरिकांना फसवण्यात येत होते.

विदेशी नागरिकांची अशी करत होते फसवणूक

सागर गुप्ता याच्या नेतृत्वाखालील आरोपी अमेरिका आणि कॅनडामधील नागरिकांना फसविण्यासाठी अमेरिकेतील लेंडिंग पॉईंट या वित्तीय कंपनीचे अधिकारी असल्याचे सांगत असत.आरोपी फिशिंग कॉल आणि मेसेजद्वारे पीडितांशी संपर्क साधत होते. जलद वैयक्तिक कर्ज देत होते. एकदा पीडितांना आमिष दाखवले की, फसवणूक करणारे गिफ्ट कार्ड आणि क्रिप्टोकरन्सीच्या स्वरूपात त्यांच्याकडून पैसे उकळत होते. सुरतमधील प्रशांत राजपूत नावाच्या एका सहकार्‍याच्या मदतीने हे पैसे भारतीय चलनात रूपांतरित केले जात होते.

‘डायलर’ ‘क्लोजर’ची नियुक्ती

मुख्य आरोपी सागर गुप्ता याने घोटाळा करण्यासाठी ऑपरेटर्सची एक छोटी टीम नियुक्त केली होती, ज्यांना कॉल-सेंटरच्या भाषेत ‘डायलर’ आणि ‘क्लोजर’ म्हणून ओळखले जाते. यामधील डायलर म्हणजे कॉल सुरू करणारे आणि ग्राहकांशी संभाषण सुरू करणारे, तर क्लोजर म्हणजे नंतर संभाषण व्यवस्थापित करणारे, ग्राहकांचा विश्वास मिळवणारे आणि त्यांच्याकडून पैसे उकळणारे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT