Param Rudra Computer | आयआयटी मुंबईमध्ये ‘परम रुद्र’ सुपरकॉम्प्युटर कार्यान्वित Pudhari File Photo
मुंबई

Param Rudra Computer | आयआयटी मुंबईमध्ये ‘परम रुद्र’ सुपरकॉम्प्युटर कार्यान्वित

पुढारी वृत्तसेवा

मुंबई : देशांतर्गत तंत्रज्ञानावर आधारित अत्याधुनिक ‘परम रुद्र’ सुपरकॉम्प्युटिंग सुविधा आयआयटी मुंबईत कार्यान्वित करण्यात आली. विज्ञान व तंत्रज्ञान विभागाचे सचिव प्रा. अभय करंदीकर यांच्या हस्ते या सुविधेचे उद्घाटन करण्यात आले. ही प्रणाली ‘सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ अ‍ॅडव्हान्स्ड कम्प्युटिंग’ यांच्या माध्यमातून उभारण्यात आली आहे.

‘परम रुद्र’ हा ‘सी-डॅक’ने स्वदेशी पातळीवर डिझाईन केलेल्या रुद्र सर्व्हर्सवर आधारित आहे. त्याचे उत्पादन भारतातच करण्यात आले आहे. त्यामुळे ‘मेक इन इंडिया’ उपक्रमाला चालना मिळाली आहे. 3 पेटा फ्लॉप्स क्षमतेची ही उच्च कार्यक्षम संगणकीय प्रणाली राष्ट्रीय सुपरकॉम्प्युटिंग मिशनअंतर्गत बिल्ड अ‍ॅप्रोच पद्धतीने विकसित करण्यात आली आहे.

या प्रणालीत ‘सी-डॅक’चा स्वदेशी सॉफ्टवेअर वापरण्यात आला आहे. ऊर्जा कार्यक्षमतेसाठी डायरेक्ट कॉन्टॅक्ट लिक्विड कूलिंग तंत्रज्ञानाचा यात समावेश करण्यात आला आहे. राष्ट्रीय सुपरकॉम्प्युटिंग मिशन हे इलेक्ट्रॉनिक्स व माहिती-तंत्रज्ञान मंत्रालय आणि विज्ञान व तंत्रज्ञान विभाग यांच्या संयुक्त मार्गदर्शनाखाली राबवले जात आहे. ‘सी-डॅक’ आणि ‘आयआयएससी’ बंगळूर या संस्थांच्या माध्यमातून या उपक्रमाची अंमलबजावणी करण्यात येत आहे. स्वदेशी सुपरकॉम्प्युटिंगचे जाळे उभारणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.

‘परम रुद्र’ सुपरकॉम्प्युटरमुळे आयआयटी मुंबईतील सुमारे 200 हून अधिक प्राध्यापक आणि 1 हजार 200 विद्यार्थी, तसेच देशभरातील संशोधकांना प्रगत संगणकीय संशोधनासाठी मोठी मदत होणार आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता, जैवतंत्रज्ञान आणि प्रगत उत्पादन तंत्रज्ञान या क्षेत्रांतील संशोधनाला यामुळे गती मिळेल, तसेच स्टार्टअप्स आणि उद्योगाभिमुख संशोधनालाही पाठबळ मिळेल, असे प्रा. अभय करंदीकर यांनी यावेळी सांगितले. रुद्रआधारित क्लस्टर हा भारताच्या स्वदेशी सुपरकॉम्प्युटिंग प्रवासातील महत्त्वाचा टप्पा आहे. भविष्यात एक्सास्केल संगणनाकडे वाटचाल करण्यासाठी एचपीसी प्रणाली, सॉफ्टवेअर, मायक्रोप्रोसेसर आणि नेटवर्किंगमध्ये सातत्यपूर्ण गुंतवणूक आवश्यक असल्याचे इलेक्ट्रॉनिक्स व माहिती-तंत्रज्ञान मंत्रालयाच्या समूह समन्वयक सुनीता वर्मा यांनी सांगितले.

संगणकीय क्षमता 44 पेटा फ्लॉप्स

‘परम रुद्र’च्या समावेशामुळे देशभरात आतापर्यंत 38 सुपरकॉम्प्युटर्स सुरू करण्यात आले आहेत. त्यांची एकूण संगणकीय क्षमता 44 पेटा फ्लॉप्स इतकी झाली आहे. आयआयटी मुंबईतील ही सुविधा मुंबई व परिसरातील विविध संस्थांच्या संशोधन क्षमतेत वाढ करेल आणि सहकार्यात्मक वैज्ञानिक संशोधनाला चालना देईल, असे मत राष्ट्रीय सुपरकॉम्प्युटिंग मिशनचे मिशन संचालक डॉ. हेमंत दरबारी यांनी मांडले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT