मुंबई: आयआयटी मुंबईचा विद्यार्थी साहिल वाकोडे याच्या मृत्यूप्रकरणी न्याय मिळावा, या मागणीसाठी त्याचे वडील रविंद्र वाकोडे सोमवारपासून मुंबईतील आझाद मैदानात ठिय्या आंदोलन सुरू करणार आहेत. जोपर्यंत मुलाच्या मृत्यूस जबाबदार असलेल्या व्यक्तींवर कारवाई होत नाही, तोपर्यंत बेमुदत उपोषण सुरूच ठेवण्याचा निर्धार त्यांनी रविवारी व्यक्त केला.
मला अटक झाली तरी माझी पर्वा नाही. माझ्या मुलाला न्याय मिळाला पाहिजे. शिवाजी महाराज, फुले, शाहू , डॉ. आंबेडकर यांची ही भूमी आहे. मी आझाद मैदानात ठिय्या आंदोलन सुरू करणार असून न्यायासाठी माझा लढा सुरूच राहील, असे त्यांनी सांगितले.
साहिल वाकोडे हा २२ वर्षीय विद्यार्थी आयआयटी मुंबईमध्ये ऊर्जा विज्ञान आणि अभियांत्रिकीच्या द्वितीय वर्षात शिकत होता. १८ सप्टेंबरच्या संध्याकाळी वसतिगृहातील खोलीत तो मृतावस्थेत आढळून आला होता.
साहिलच्या पालकांनी त्याच्याशी जातीय भेदभाव झाल्याचा आरोप केला आहे. या प्रकरणाच्या निषेधार्थ त्यांनी गुरुवारी आझाद मैदानात उपोषणही केले होते. दरम्यान, साहिलच्या मृत्यूला प्रवृत्त केल्याच्या आरोपासह जातीय भेदभावाच्या तक्रारीची मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून चौकशी सुरू आहे.
साहिलच्या मृत्यूच्या परिस्थितीची चौकशी करण्यासाठी आयआयटी मुंबईच्या मंडळाने यापूर्वी दहा सदस्यांची समिती स्थापन केली आहे. पोलिसांच्या एफआयआरमध्ये जातीय भेदभाव आणि आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपांखाली नाव असलेले प्रा. सूर्यनारायण दुल्ला यांना निष्पक्ष चौकशीसाठी आधीच रजेवर पाठवण्यात आले आहे.
शुक्रवारी रात्री आयआयटीच्या विद्यार्थ्यांनी साहिलच्या मृत्यूच्या चौकशी समितीची पुनर्रचना करण्याच्या मागणीसाठी कॅन्डल मार्च काढला. विद्यमान चौकशी समितीतील काही सदस्यांनी प्रा. दुल्ला यांच्या समर्थनार्थ भूमिका घेतल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे.