IIT Bombay Pudhari
मुंबई

IIT Bombay Mental Health Support: आयआयटी मुंबईत विद्यार्थ्यांसाठी २४ तास समुपदेशन; तक्रार निवारण पोर्टल, स्वतंत्र ॲप विकसित करणार

दोन मानसोपचारतज्ज्ञ चोवीस तास उपलब्ध होणार; स्वतंत्र कल्याण ॲप आणि तक्रार निवारण पोर्टल विकसित करण्याचे नियोजन

पुढारी वृत्तसेवा

मुंबई: साहिल वाकोडे आत्महत्येप्रकरणानंतर आयआयटी मुंबईने विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्यासाठी २४ तास मानसिक आरोग्य सहाय्य यंत्रणा सुरू केली आहे. विद्यार्थ्यांना मानसिक आरोग्य सहाय्य तातडीने मिळावे यासाठी दोन मानसोपचारतज्ज्ञ चोवीस तास उपलब्ध करून देण्यासह, स्वतंत्र कल्याण अनुप्रयोग व तक्रार निवारण पोर्टल विकसित करण्याचे नियोजन संस्थेने केले आहे.

साहिलच्या मृत्यूशी संबंधित परिस्थितीची स्वतंत्र चौकशी सुरू असून, विद्यार्थ्यांना मानसिक आरोग्य सहाय्य मिळावे यासाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजनांची आयआयटी मुंबईने पुनर्नियोजित परीक्षा सुरळीत पार पडल्यानंतर विद्यार्थ्यांना ई-मेल पाठवून माहिती दिली.

विद्यार्थ्यांना मानसिक तणावाच्या काळात तातडीने मदत मिळावी, यासाठी संस्थेने ‘आरोग्य व कल्याण प्रतिसाद पथक’ सुरू केले आहे. या पथकामध्ये समुपदेशक आणि मानसोपचारतज्ज्ञांचा समावेश असणार आहे.

संकटाच्या परिस्थितीत मदतीची गरज असलेल्या विद्यार्थ्यांपर्यंत हे पथक कॅम्पसमधील कोणत्याही ठिकाणी पोहोचणार आहे. विद्यार्थ्यांशी संबंधित निर्णयप्रक्रिया अधिक पारदर्शक व न्याय्य करण्यासाठी विभागीय शैक्षणिक समितीच्या कामकाजाचा आढावा घेण्यात येणार आहे.

या समितीशी संबंधित इतर समित्या व परीक्षांमधील गैरप्रकारांच्या प्रकरणांसाठी लागू असलेल्या प्रमाणित कार्यप्रणालींचाही आढावा घेण्यासाठी स्वतंत्र समिती स्थापन करण्यात येत आहे.

स्वतः मानसिक तणावात असलेले विद्यार्थी किंवा आपल्या मित्राची काळजी वाटणारे विद्यार्थी ८३५६८१०२५२ या क्रमांकावर संपर्क साधू शकतात. तसेच wellness @iitb.ac.in या ई-मेलवरही संपर्क साधण्याची सुविधा देण्यात आली आहे. आपत्कालीन परिस्थितीत ई-मेल करण्याऐवजी दूरध्वनीवर संपर्क साधण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT