आमिष दाखवून सध्‍या सुरु असलेल्‍या अवैधरित्‍या धर्म बदलण्याचा खेळ असाच सुरू राहिला तर देशातील बहुसंख्य जनता एक दिवस अल्पसंख्याक होईल, अशी टिप्‍पणी अलाहाबाद उच्‍च न्‍यायालयाने केली.  File Photo
मुंबई

अशी धर्मांतरे सुरुच राहिली तर हिंदू होतील अल्पसंख्याक

उत्तर प्रदेशातील गरिबांच्या धर्मांतरावर हायकोर्टाचे कडक ताशेरे

पुढारी वृत्तसेवा

प्रयागराज : उत्तर प्रदेशमध्ये गोरगरीब लोकांना लक्ष्य करून त्यांची दिशाभूल करून ख्रिश्चन केले जात आहे. मोहीम म्हणून अशीच धर्मांतरे सुरू राहिली तर एक दिवस भारतात हिंदू अल्पसंख्याक होतील, असे स्पष्ट करून मोहीम म्हणून धर्मांतर करणाऱ्या मेळाव्यांवर तत्काळ बंदी घालावी, असे आदेश अलाहाबाद उच्च न्यायालयाने मंगळवारी दिले.

धर्मांतराचे असे प्रकार संविधानाच्या विरोधात आहेत, असेही न्यायमूर्ती रोहित रंजन अग्रवाल यांनी एका जामीन अर्जावर निकाल देताना स्पष्ट केले. एका हिंद व्यक्तीचे धर्मांतर करून त्याला ख्रिश्चन बनविल्याचा आरोप असलेल्या हमीरपूर येथील आरोपीचा जामीन अर्जही न्यायालयाने फेटाळून लावला.

राज्यघटनेचे कलम २५ धार्मिक प्रचाराला परवानगी देते, पण मोहीम म्हणून धर्मांतराला परवानगी देत नाही. उत्तर प्रदेशात धार्मिक मेळावे घेऊन गोरगरिबांची दिशाभूल करून त्यांना ख्रिश्चन बनवले जात असल्याचे समोर आले आहे. एका संपूर्ण गावाचे असे धर्मांतर केल्याचा प्रकारही समोर आला आहे. न्यायालयासमोर आलेल्या प्रकरणातील आरोपी कैलास हास्वतः ही धर्मांतरित आहे. हमीरपूरच्या रामकली प्रजापती यांनी त्याच्याविरोधात तक्रार नोंदवली होती. रामकली यांचा भाऊ मानसिकदृष्ट्या आजारी होता, कैलास त्याला दिल्लीला घेऊन गेला. नंतर कैलास पुन्हा गावी आला आणि गावातील अनेक लोकांना घेऊन दिल्लीला गेला. तिथल्या एका मेळाव्यात या सगळ्यांनी ख्रिश्चन धर्म स्वीकारला. त्याबदल्यात सगळ्यांना पैसे देण्यात आले.

रासुका लावून मालमत्ता जप्तीचे मुख्यमंत्र्यांचे आदेश

उत्तर प्रदेशातील नोएडा येथे दोन वर्षांपूर्वी मूकबधिर मुलांच्या धर्मांतराचे प्रकरण समोर आले होते. मौलाना उमर आणि जहांगीर या दोघांना यूपी एटीएसने अटक केली होती. जे कुणी मोहीम म्हणून, फसवून, असहायतेचा गैरफायदा घेऊन धर्मांतरे घडवून आणतील त्यांच्याविरोधात राष्ट्रीय सुरक्षा कायदा लागू करावा आणि त्यांची मालमत्ताही जप्त करावी, असे आदेश तेव्हा मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दिले होते.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT