मुंबई : कृत्रिम तलाव व इतर जलस्रोतांमध्ये विसर्जित झालेल्या गणेशमूर्ती 24 तासांच्या आत पुनर्प्राप्त करण्याचा निर्णय मुंबई महापालिकेने घेतला आहे. गणेशोत्सव पर्यावरपूरक पद्धतीने साजरा करण्यासाठी उच्च न्यायालय व केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने दिलेल्या निर्देशांचे पालन करण्यासाठी विसर्जनानंतर मूर्तींची पुनर्प्राप्ती आणि पुनर्प्रक्रियेबाबत महापालिकेने मार्गदर्शक तत्त्वे निश्चित केली आहेत.
लहान मूर्तींसाठी मनुष्यबळ, तर मोठ्या मूर्तींसाठी क्रेनसारख्या यंत्रसामग्रीचा वापर केला जाणार आहे. पीओपीच्या मूर्ती विसर्जित झाल्यानंतर त्यांची पुनर्प्राप्ती करणे, नंतर पुनर्प्रक्रिया करणे, त्याच्या कोणकोणत्या शास्रोक्त पद्धती असू शकतात, हे जाणून घेण्यासाठी तज्ज्ञ समिती गठीत करण्यात येणार आहे.
ही समिती नेमून शिफारसी प्राप्त होणे, त्यांची अंमलबजावणी करणे तसेच उच्च न्यायालयाचे निर्देश आणि केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन योग्य रीतीने व्हावे, यासाठी मुंबई पालिकेने मार्गदर्शक तत्त्वे ठरवून दिलेली आहेत. या प्रक्रियेवर संबंधित परिमंडळाचे उपआयुक्त देखरेख करणार आहेत.
वाहतुकीसाठी दर निश्चित
पुनर्प्राप्त मूर्तींची पुनर्प्रक्रिया केंद्रापर्यंत (डायघर, शिळफाटा) वाहतूक करण्यासाठी आधारभूत दर निश्चित केले आहेत. शहर विभागासाठी 100 किमीसाठी9,628, पूर्व उपनगरांसाठी 80 किमीकरिता 8,788 आणि पश्चिम उपनगरांसाठी 100 किमीकरिता 9,628 रुपये असे दर ठरवले आहेत. यात चालक, कामगार, इंधन, पथकर, वाहनतळ, विमा व इतर सर्व खर्चांचा समावेश आहे. प्रत्येक वाहनात किमान तीन कामगार असणे बंधनकारक राहील.
महापालिकेने सांगितलेले उपाय
वाहतुकीपूर्वी मूर्तीतील अतिरिक्त पाणी काढणे.
मूर्ती ठेवताना व उतरवताना काळजी घेणे.
बंदिस्त वाहनांसाठी नवीन ताडपत्रीचा वापर.
वजन काट्यावर वाहन व मूर्तीचे वजन नोंदवणे.
देखरेखीसाठी कर्मचार्यांची नेमणूक करणे.