Devendra Fadnavis Pudhari
मुंबई

Devendra Fadnavis: ‘दिल्लीत जाणार नाही!’ फडणवीसांनी स्पष्टचं सांगितलं; पंतप्रधानपदाबाबत केलं मोठं भाष्य, नेमकं काय म्हणाले?

Devendra Fadnavis Maharashtra 2029: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २०२९ पर्यंत महाराष्ट्रातच राहणार असून दिल्लीत जाणार नसल्याचे स्पष्ट केले.

Rahul Shelke

Devendra Fadnavis Maharashtra 2029: पुढारी न्यूजच्या तिसऱ्या वर्धापन दिनानिमित्त मुंबईत आज दिवसभर ‘पुढारी न्यूज महासमिट’चे आयोजन करण्यात आले आहे. या महासमिटमध्ये ‘महाराष्ट्र जेन नेक्स्ट’ या विषयावर विशेष संवादाचे आयोजन करण्यात आले असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विशेष मुलाखत घेण्यात आली. या मुलाखतीत फडणवीस यांनी महाराष्ट्राच्या राजकारणासह आपल्या आगामी राजकीय वाटचालीबाबत महत्त्वाचे भाष्य केले.

‘मी महाराष्ट्रातच राहणार आहे, दिल्लीत जाणार नाही’, असे स्पष्ट करत देवेंद्र फडणवीस यांनी आपण २०२९ पर्यंत महाराष्ट्रातच राहणार असल्याचे सांगितले. त्यामुळे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या दिल्लीतील राजकीय भूमिकेबाबत सुरू असलेल्या चर्चांना त्यांनी यावेळी पूर्णविराम दिला.

‘२०२९ मध्येही नरेंद्र मोदीच पंतप्रधान होतील’

पंतप्रधानपदाबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना फडणवीस यांनी पुढील लोकसभा निवडणुकीनंतरही नरेंद्र मोदीच देशाचे पंतप्रधान होतील, असा विश्वास व्यक्त केला.

“नवीन पिढीचा नरेंद्र मोदी यांच्यावर विश्वास आहे. त्यामुळे पुढच्या निवडणुकीनंतरही पंतप्रधानपदी नरेंद्र मोदीच राहतील,” असे फडणवीस यांनी सांगितले.

‘महाराष्ट्र जेन नेक्स्ट’वर विशेष चर्चा

पुढारी न्यूजच्या तिसऱ्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या महासमिटमध्ये ‘नवी धोरणे, नवी उद्दिष्टे... महाचर्चा महाराष्ट्राची!’ या संकल्पनेवर दिवसभर विविध विषयांवर चर्चा होणार आहे. उपमुख्यमंत्री, मंत्री तसेच विविध क्षेत्रांतील दिग्गज नेते या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत.

सत्ताधारी आणि विरोधकांसह प्रशासकीय अधिकारी, कलाकार आणि विविध क्षेत्रांतील मान्यवर एकाच व्यासपीठावर येणार आहेत. उद्याचा महाराष्ट्र घडवण्यासाठी संधी, आव्हाने आणि नव्या पिढीची भूमिका यावर महासमिटमध्ये विचारमंथन केले जाणार आहे.

तरुण नेत्यांकडून ‘तरुणांच्या राजकारणा’वर चर्चा

महासमिटमध्ये आयोजित ‘महाराष्ट्र जेन नेक्स्ट’ संवादात राजकारणातील तरुण नेते सहभागी होणार असून, तरुणांचा राजकारणातील सहभाग, त्यांच्या अपेक्षा आणि महाराष्ट्राच्या भविष्यातील राजकीय दिशा यावर चर्चा केली जाणार आहे.

याशिवाय सनदी अधिकारी तुकाराम मुंढे आणि श्रीकांत सिंग यांचाही या कार्यक्रमात सहभाग असणार आहे. अभिनेता स्वप्नील जोशी हेदेखील पुढारी न्यूजच्या व्यासपीठावर उपस्थित राहणार आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT