HSC Paper Checking Payment Pudhari
मुंबई

HSC Paper Checking Payment: महिना उलटूनही बारावीच्या पेपरतपासणीचे मानधन नाही; शिक्षक संतप्त

दोन कोटी रुपये बँकेत अडकले

पुढारी वृत्तसेवा

मुंबई: बारावीच्या उत्तरपत्रिका तपासणाऱ्या मुंबई विभागातील हजारो शिक्षकांना मानधनासाठी अद्यापही प्रतीक्षा करावी लागत आहे. निकाल जाहीर होऊन तब्बल एक महिना उलटूनही पेपरतपासणीचे पैसे खात्यावर जमा न झाल्याने शिक्षकांमध्ये तीव्र नाराजी पसरली असून जुलै महिन्यात होणाऱ्या परीक्षांच्या कामकाजावर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिला आहे.

मुंबई विभागीय शिक्षण मंडळाने सुमारे 9 हजार 800 शिक्षकांच्या मानधनासाठी जवळपास 2 कोटी रुपयांची रक्कम वाशी येथील बँक ऑफ इंडियाच्या शाखेत जमा केली होती. 25 एप्रिल, 7 मे आणि 11 मे रोजी टप्प्याटप्प्याने ही रक्कम बँकेकडे सुपूर्द करण्यात आली.

मात्र, अपेक्षेप्रमाणे दोन दिवसांत शिक्षकांच्या खात्यावर पैसे जमा न होता महिनाभर उलटूनही बहुतांश शिक्षकांना मानधन मिळालेले नसल्याचे मुंबई विभागीय कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेचे सरचिटणीस प्रा. मुकुंद आंधळकर यांनी सांगितले.

केवळ सुमारे 2 हजार शिक्षकांनाच मानधन मिळाले असून उर्वरित 7 हजार 500 शिक्षकांचे पैसे अद्याप अडकून आहेत. राज्य मंडळाने याकडे लक्ष द्यावे, असेही संघटनेने म्हटले आहे.दरवर्षी बारावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर काही दिवसांतच पेपरतपासणीचे मानधन शिक्षकांच्या खात्यावर जमा केले जाते.

यंदा 2 मे रोजी निकाल जाहीर झाला; मात्र 2 जून उजाडूनही मानधन न मिळाल्याने शिक्षकांमध्ये असंतोष वाढला आहे. विद्यार्थ्यांकडून परीक्षा शुल्क वेळेत वसूल केले जाते, विलंब झाल्यास दंड आकारला जातो; मात्र शिक्षकांचे मानधन रखडले तरी त्यांना कोणतीही अतिरिक्त भरपाई मिळत नसल्याचे शिक्षकांचे म्हणणे आहे.

प्रा. आंधळकर यांनी या प्रकरणाची चौकशी करून संबंधितावर दंड आकारावा, शिक्षकांना व्याजासह मानधन द्यावे तसेच पैस देण्यासाठी मंडळाने तातडीने पर्यायी व्यवस्था करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

बारावीच्या उत्तरपत्रिका तपासणीचे काम शिक्षकांनी वेळेत पूर्ण केले, शिक्षण मंडळानेही मानधनाची रक्कम बँकेत जमा केली; मात्र महिनाभर उलटूनही हजारो शिक्षकांना पैसे मिळालेले नाहीत. शिक्षकांच्या मानधनाचे कोट्यवधी रुपये अडवून ठेवणे हा गंभीर प्रकार आहे. अन्यथा शिक्षकांमधील असंतोष वाढेल आणि पुरवणी परीक्षा प्रक्रियेवर त्याचा परिणाम होईल.
- प्रा. मुकुंद आंधळकर, सरचिटणीस, मुंबई विभागीय कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटना

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT