रतन टाटा.  (Photo- PTI)
मुंबई

Ratan Tata death : 'टेटली ते जग्वार लँड रोव्हर डील करणारा दिग्गज'!

दीपक दि. भांदिगरे

पुढारी ऑनलाईन डेस्क : ख्यातनाम उद्योजक आणि टाटा उद्योग समूहाचे अध्वर्यू रतन नवल टाटा (Ratan Tata death) यांचे बुधवारी रात्री दीर्घ आजाराने वयाच्या ८६ व्या वर्षी निधन झाले. त्यांना देश- विदेशातील मान्यवरांनी श्रद्धांजली वाहिली आहे. ''रतन टाटा हे एक दूरदर्शी उद्योजक, एक दयाळू आणि एक असामान्य व्यक्ती होते. त्यांनी भारतातील सर्वात जुन्या आणि प्रतिष्ठित उद्योग समुहाला स्थिर नेतृत्व दिले. त्याचवेळी, त्यांच्या नम्र आणि दयाळू स्वभावामुळे आणि समाजाला अधिक चांगले बनविण्याच्या त्यांच्या अतूट बांधिलकीमुळे ते लोकप्रिय होते.'' अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी श्रद्धांजली वाहिली आहे.

Ratan Tata news : त्यांचे भारतीय उद्योगाचे साम्राज्य जगभर पसरले....

ज्यांचे भारतीय उद्योग साम्राज्य जगभर पसरले; ते रतन टाटा यांचे ८६ व्या वर्षी निधन झाले. टाटा समूहाचे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी म्हणून १९९१ ते २०१२ या २१ वर्षांच्या त्यांच्या कारकिर्दीत टाटा समूहाचा नफा ५० पटीने वाढला. सर्वाधिक महसूल हा जग्वार आणि लँड रोव्हर वाहने आणि टेटली टी सारख्या ओळखल्या जाणाऱ्या टाटा उत्पादनांच्या परदेशातील विक्रीतून आला होता, असे द न्यूयॉर्क टाईम्सने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे. मध्यमवर्गीय भारतीयांचा एकही दिवस टाटांच्या वस्तू आणि सेवा खरेदी केल्याशिवाय गेला नाही. ते सकाळी उठून टाटा चहा, दूरदर्शनवर टाटा स्कायचे कार्यक्रम पाहणे, टाटा टॅक्सीतून अथवा स्वतःच्या टाटा कारमधून प्रवास आणि टाटा स्टीलपासून बनवलेली असंख्य उत्पादने असे टाटा आणि मध्यम वर्गीय भारतीयांचे अनोखे नाते असल्याचे द न्यूयॉर्क टाईम्सने म्हटले आहे.

जग्वार, लँड रोव्हर डीलमुळे जागतिक उद्योग जगताचे लक्ष वेधून घेतले

२००८ मध्ये टाटा मोटर्सने फोर्ड (एफ) कडून ब्रिटीश कार ब्रँड जग्वार आणि लँड रोव्हरची खरेदी केली. त्यांच्या या हाय-प्रोफाइल आंतरराष्ट्रीय डीलमुळे उद्योजक रतन टाटा यांनी जागतिक उद्योग जगताचे लक्ष वेधून घेतले होते. त्यांनी टाटा उद्योगाला जागतिक स्तरावर नेल्याचे 'सीएनएन'ने म्हटले आहे.

'टाटांनी भांडवलशाहीला परोपकाराशी जोडले'

'बीबीसी'ने रतन टाटा यांच्या निधनानंतर 'Ratan Tata, the 'modest' Indian tycoon' या शीर्षकाखाली लेख लिहिला आहे. या लेखात द स्टोरी ऑफ टाटा या टाटा समूहावरील अधिकृत पुस्तकाचा संदर्भ देण्यात आला आहे. या पुस्तकाचे लेखक पीटर केसी यांच्या म्हणण्यानुसार, "इतरांचे जीवन चांगले बनविण्यासाठी भांडवलशाहीला परोपकाराशी जोडणे." हा टाटा कंपनीचा सिद्धांत आहे. दिग्गज रतन टाटा यांनी नेतृत्व केलेल्या टाटा समूहाला, "सॉल्ट-टू-सॉफ्टवेअर" समूह म्हणून ओळखले जाते, ज्यात १०० हून अधिक कंपन्यांचा समावेश आहे. दोन दशकांहून अधिक काळात टाटा समूहाने सुमारे ६ लाख ६० हजार लोकांना रोजगार मिळवून दिला आहे. त्याची वार्षिक कमाई १०० अब्ज डॉलर्सहून अधिक आहे, असे पुढे 'बीबीसी'च्या लेखात म्हटले आहे.

जगातील सर्वात स्वस्त कार नॅनोचा जनक

टाटा यांनी इंडिकाची निर्मिती केली. ही भारतात डिझाइन केलेले आणि तयार केलेले पहिले कार मॉडेल आहे. जगातील सर्वात स्वस्त कार नॅनोच्या डिझाईनमध्येही त्यांचे मोठे योगदान आहे, असे 'द गर्डियन'ने म्हटले आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT