ख्रिसमस, थर्टी फर्स्टचे 'नो टेन्शन' file photo
मुंबई

थर्टी फर्स्टचे 'नो टेन्शन'! बार पहाटे ५ वाजेपर्यंत सुरु ठेवण्यास परवानगी

पहाटे ५ पर्यंत बार, रेस्टॉरंट खुले राहणार; वाईन शॉपला रात्री १ पर्यंत परवानगी

पुढारी वृत्तसेवा

मुंबई : व्हिस्कीचा पेग रिचवत आणि बिअरच्या सळसळत्या फेसाचा आनंद घेत ख्रिसमस आणि नव्या वर्षाचे स्वागत करणाऱ्यांना आता चिंता करण्याचे कारण नाही. कारण दरवर्षीप्रमाणे यंदाही २४,२५ आणि ३१ डिसेंबर रोजी मुंबईसह अवघ्या राज्यभरात हॉटेल, रेस्टॉरंट, बार पहाटे ५ वाजेपर्यंत सुरु ठेवण्यास गृह विभागाने परवानगी दिली आहे. गृह विभागाची ही परवानगी म्हणजे तळीरामांसाठी आनंदाची पर्वणी असणार आहे.

ख्रिसमस अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपला आहे. ख्रिसमस सणाचा आतापासूनच जल्लोष सुरु असतानाच सध्या सर्वांना नव्या वर्षाच्या स्वागताचे वेध लागले आहेत. एरव्ही रात्री १.३० पर्यंत हॉटेल, बार सुरु ठेवण्यास परवानगी आहे. मात्र, २४, २५ आणि ३१ डिसेंबर या तीन दिवशी पहाटे पाचवाजेपर्यंत परमीट रुम, ऑर्केस्ट्रा बार, बीयर बार सुरु ठेवण्यास परवानगी मिळाली आहे. शहरी भागात पहाटे ५ पर्यंत तर ग्रामीण भागात १ वाजेपर्यंत सुरु राहणार आहेत. तसेच या तीन दिवशी शहरी भागात वाईन शॉप रात्री १ वाजेपर्यंत तर ग्रामीण भागात रात्री ११ पर्यंत खुली राहणार आहेत. खुल्या जागी होणाऱ्या संगीत रजनीसाठी मध्यरात्री बारा वाजेपर्यंत परवानगी देण्यात येणार असल्याने नवीन वर्षाच्या स्वागताच्या पार्ध्या जोरात रंगणार आहेत. मात्र, सार्वजनिक शांतता, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवल्यास दिलेली वेळ शिथिल करण्याचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. दरम्यान, ३१ डिसेंबरच्या निमित्ताने अवैध दारू विक्रीवर राज्य उत्पादन शुल्क आणि पोलीस विभागांच्या पथकांचे लक्ष असणार आहे. तसेच दारू पिऊन वाहन चालवताना आढळले तर तळीरामांना नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी पोलीस कोठडीची हवा खावी लागणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT