मुंबई : नोव्हेंबर महिन्यात मुंबईत १२ हजार २१९ मालमत्तांची विक्री झाली. गेल्या वर्षीच्या तुलनेत यात २० टक्के वाढ झाली आहे. २०१३ सालानंतर नोव्हेंबर महिन्यात झालेली ही सर्वाधिक विक्री आहे. यावर्षी नोव्हेंबरच्या विक्रीतून १ हजार ३८ कोटी मुद्रांक शुल्क जमा झाले. यात गेल्या वर्षीच्या तुलनेत १२ टक्के वाढ झाली.
यावर्षी जानेवारी ते नोव्हेंबर या काळात १ लाख ३५ हजार ८०७मालमत्तांची विक्री झाली. यातून १२ हजार २२४ कोटींची भर राज्याच्या तिजोरीत पडली. मालमत्ता विक्रीमध्ये वार्षिक ५ टक्के, तर महसुलात वार्षिक ११ टक्के वाढ झाली. १ कोटीपेक्षा कमी किमतीच्या घरांची मागणी यावर्षी कमी झाली. नोव्हेंबर २०२४मध्ये एकूण
विक्रीपैकी ४६ टक्के घरे १ कोटीपेक्षा कमी किमतीची होती, तर यावर्षी हे प्रमाण ४२ टक्के आहे. १ ते २ कोटी किंमत असणाऱ्या घरांची विक्री गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये ३१ टक्के झाली होती. यावर्षी त्यात ३३ टक्क्यांपर्यंत वाढ झाली. २ ते ५ कोटींच्या घरांची मागणी गतवर्षीप्रमाणेच १८ टक्के आहे. ५ कोटींपेक्षा अधिक किमतीच्या घरांना गेल्या वर्षी ५ टक्के मागणी होती, तर यावर्षी या घरांचे प्रमाण ७ टक्के आहे.