मुंबई : मुंबईतील शताब्दी रुग्णालयात एचआयव्ही पॉझिटिव्ह असल्याच्या कारणावरून जीवघेण्या अपेंडिसाइटिसने त्रस्त रुग्णाला तातडीच्या शस्त्रक्रियेस नकार देण्यात आला. वैद्यकीय नियमांचे उल्लंघन करत रुग्णाला कूपर रुग्णालयास पाठविण्यात आले. परंतु, तेथील सर्जरी विभागाकडे त्यांनी दिलेले कारण फेटाळून पुन्हा पाठविले तरीदेखील शताब्दी रुग्णालय प्रशासनाने उपचार करण्यास साफ नकार दिला. शेवटी या रुग्णाला नायर रुग्णालयात दाखल व्हावे लागले असून त्याच्यावर सध्या उपचार सुरू आहेत.
या प्रकरणाने मनपाच्या आरोग्य व्यवस्थेतील अनेक घोटाळे उघडे केले आहेत. डीएनबी शिक्षक बायोमेट्रिक हजेरीनंतर खासगी प्रॅक्टिससाठी गायब होतात; प्लास्टिक सर्जन डॉ. हर्षल शाह यांच्याकडे सर्जरी विभागाची जबाबदारी आहे; तर वरिष्ठ डॉक्टरांच्या संगनमताने अशा प्रकार सुरू आहेत.
‘डॉक्टरांनी मला ऑपरेशन थिएटरमध्ये नेलं... आणि मग बाहेर काढलं!’
31 ऑक्टोबर रोजी शताब्दी रुग्णालयात दाखल झालेल्या सागीरर सईद या रुग्णावर हा अन्याय झाला. डॉ. राजेश मोरे आणि डॉ. तुषार वालावी यांच्या युनिटमध्ये दाखल झालेल्या सईद यांना केवळ एचआयव्ही पॉझिटिव्ह असल्यामुळे शस्त्रक्रियेशिवायच डिस्चार्ज करण्यात आले. आश्चर्य म्हणजे, अपेंडेक्टॉमी ही देशातील लहानातल्या लहान ग्रामीण रुग्णालयांत होणारी नियमित शस्त्रक्रिया असूनही, शताब्दीतील डॉक्टरांनी ती करण्यास नकार दिला.
रूग्ण सागीर सईद म्हणाले,“मी एकटाच राहतो, गरीब परिस्थितीत कसाबसा दाखल झालो. मला ऑपरेशन थिएटरमध्ये नेलं गेलं. पण रक्त तपासणीत एचआयव्ही पॉझिटिव्ह आल्याचं कळताच डॉक्टरांनी शस्त्रक्रिया रद्द केली. मग मला कूपरला, तिथून परत शताब्दीला, आणि अखेरीस नायरला फिरावं लागलं.”
कूपर रुग्णालयाचा ठाम नकार
कूपर रुग्णालयाच्या सर्जरी विभागाने स्पष्टपणे नमूद केलं की एचआयव्ही पॉझिटिव्ह असणं हे शस्त्रक्रियेसाठी वैद्यकीय प्रतिबंधक कारण नाही. तरीदेखील शताब्दी रुग्णालय प्रशासनाने या स्पष्टतेकडे दुर्लक्ष करत रुग्णाचा उपचार नाकारला.