मुंबई : प्रबोधन, जागरूकता मोहीम आणि अत्याधुनिक उपचारपद्धती यांमुळे जीवघेणा ठरलेला एड्स आजार हळूहळू हद्दपार होऊ लागला आहे. पाच वर्षांपूर्वी या आजाराचे प्रमाण ०.०७% होते. आता हे प्रमाण ०.०५ टक्के आहे. मात्र गर्भवती महिलांमध्ये अजूनही एड्स वाढत असल्याचे पुढे आले आहे. या वर्षी ऑक्टोबर महिन्यापर्यंत मुंबईत १५३८ एचआयव्ही रुग्णसंख्येची नोंद झाली. मृत्युदर कमी झाला असून दहा महिन्यांत ४८१ जणांचा मृत्यू झाला.
नव्याने निदान झालेल्या एचआयव्ही रुग्णांपैकी ९५ टक्के लोकांना असुरक्षित लैंगिक संबंधातून संसर्ग झाला आहे. एचआयव्हीचे समूळ उच्चाटन करण्यासाठी २०३०चे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. त्यासाठी ९५-९५-९५ उपचारपद्धती वापरण्यात येणार आहे. या उद्दिष्टांतर्गत ९५ टक्के एचआयव्हीसह जगणाऱ्या व्यक्तींना त्यांचे एचआयव्हीची स्थिती कळेल, कोणते उपचार घ्यायचे याची माहिती होईल, तसेच उपचार घेत असलेल्या ९५ टक्के रोगप्रतिकारशक्ती सक्षम राहण्यास मदत होईल.
एचआयव्हीबाधित रुग्णांमध्ये कोणत्याही प्रकारचा भेदभाव करू नये हे यावर्षी जागतिक एड्स दिनाचे सूत्र आहे. वैद्यकीय उपचारांमध्ये रुग्णांना योग्य वैद्यकीय उपचारांसह समानतेची वागणूकही मिळायल हवी, असे मुंबई जिल्हा एड्स नियंत्रण संस्थेच अतिरिक्त प्रकल्प संचालक डॉ. विजय करंजकर यांनी सांगितले.
गर्भवतीमध्ये एचआयव्हीचे प्रमाण वाढले
गर्भवती महिलांमध्ये एचआयव्हीचे प्रमाण गेल्या पाच वर्षांच्या तुलनेत वाढले आहे. कोविड काळामध्ये चाचण्यांचे प्रमाण कमी होते. मात्र गेल्या दोन वर्षांत ते पुन्हा वाढले आहे. २०२१-२२ मध्ये १४९९६७ गर्भवती महिलांची एचआयव्ही चाचणी केली गेली. त्यात २४२ गर्भवती एचआयव्ही पॉझिटिव्ह आढळल्या, तर २०२२-२३ मध्ये १९३०९१ चाचण्यांमध्ये २२६ महिला पॉझिटिव्ह आल्या. २०२३-२४ मध्ये २१०७०० चाचण्यांमध्ये ३८७पॉझिटिव्ह आल्या. २०२४-२५ मध्ये १८१७४४ चाचण्यांमध्ये ३३८, तर यावर्षी ऑक्टोबर महिन्यापर्यंत १९५ महिला एचआयव्हीबाधित आढळल्या आहेत.