पहिलीच्या वेळापत्रकातून ‘हिंदी’ हद्दपार file photo
मुंबई

Education policy on Hindi : पहिलीच्या वेळापत्रकातून ‘हिंदी’ हद्दपार

शाळांनी तातडीने नवे विषयनिहाय तासिका वेळापत्रक तयार करावे, असे निर्देश

पुढारी वृत्तसेवा

मुंबई ः शालेय शिक्षणात पहिल्या इयत्तेपासून हिंदी तिसरी भाषा म्हणून अनिवार्य करण्यासाठी झालेल्या विरोधानंतर राज्य सरकारने तिसर्‍या भाषेचा शासन निर्णय रद्द केल्याने राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या (एससीईआरटी) नव्या वेळापत्रकातूनही तिसरी भाषा हद्दपार झाली आहे.

तिसर्‍या भाषेच्या समावेशानंतर कमी केलेला कला, क्रीडा आणि कार्यानुभवाचा वेळ आता वाढवण्यात आला आहे. शाळांनी तातडीने नवे विषयनिहाय तासिका वेळापत्रक तयार करावे, असे निर्देश दिले आहेत.

शालेय शिक्षण विभागाने हिंदी ही सर्वसाधारण भाषा असून, इयत्ता पहिलीपासून तीन भाषा शिकवल्या जातील, असा शासन निर्णय जाहीर केला. यानंतर तातडीने ‘एससीईआरटी’ने तिसर्‍या भाषेसह नवीन वेळापत्रकही जाहीर केले. तिसर्‍या भाषेच्या सक्तीवरून राज्यातून आलेला विरोध लक्षात घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तिसर्‍या भाषेसंदर्भातील सर्व शासन निर्णय रद्द केला. इयत्ता पहिली व दुसरीसाठी विषयनिहाय वेळेचे नियोजन केले आहे. या नियोजनानुसार तासिकांमधून तिसरी भाषा संपूर्णपणे वगळण्यात आली आहे. या तिसर्‍या भाषेच्या आठवड्यातील पाच तासिकांसाठी वर्ग केलेला आठवड्यातील 2 तास 55 मिनिटांचा वेळ प्रथम भाषा, कला, क्रीडा आणि कार्यानुभव या विषयांच्या तासिकांमध्ये वाढवण्यात आला आहे.

अगोदरच्या वेळापत्रकात पहिल्या भाषेसाठी संपूर्ण आठवडाभरात 35 मिनिटांच्या 15 तासिका होत्या. त्यात एका तासिकेची वाढ करण्यात आली आहे. त्याशिवाय कला व हस्तकला विषयासाठी पूर्वीच्या 4 तासिकांऐवजी 35 मिनिटांच्या 6 तासिका ठेवत 70 मिनिटे वाढवण्यात आली आहेत. क्रीडा आणि कार्यानुभव या दोन्ही विषयांसाठी पूर्वी 35 मिनिटांच्या 2 तासिका होत्या. आता त्यात एकेक तासिका वाढवण्यात आली आहे.35 मिनिटांच्या 3 तासिकांमध्ये उपचारात्मक अध्यापन, स्पर्धा परीक्षा तयारी, सराव असे उपक्रम घेता येणार आहेत. या तासिका कोणत्या विषयांसाठी वापरायच्या, याचा निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य शाळांना देण्यात आले आहे.

मराठी महाराष्ट्रात सक्तीची!

महाराष्ट्रातील सर्व शाळांमध्ये मराठी भाषा शिकवणे 8 मार्च 2024 च्या शासन आदेशानुसार सक्तीचे झाले आहे. राज्यातील सर्व शाळांत यासंबंधीचा आदेश अंमलात आला आहे. हिंदी सक्तीची करण्याचा आदेश रद्द करणारा जीआर गुरुवारी काढला गेला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT