मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे माजी आमदार बाबा सिद्दीकी यांच्या हत्या प्रकरणातील आरोपी चेतन पारधीचा जामीन नामंजूर केला. पारधीने जामिनासाठी विनंती केली होती. त्याने गँगस्टर अनमोल बिश्नोईच्या सांगण्यावरून हल्लेखोरांना मदत केल्याचे स्पष्ट होत आहे, असे निरीक्षण सत्र न्यायालयाने नोंदवले.
27 वर्षीय चेतन दिलीप पारधीने बाबा सिद्दीकी यांच्या मारेकर्यांना मदत केल्याचा आरोप आहे. याच आरोपाखाली पोलिसांनी पारधीला अटक केली होती. तो सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. अतिरिक्त सत्र न्यायाधीश महेश जाधव यांनी त्याचा जामीन अर्ज धुडकावून लावला. पारधी हा महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्याच्या कलम 21(4) अंतर्गत जामिनासाठी असलेल्या दोन अटी पूर्ण करण्यात अयशस्वी ठरल्याचे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले. सिद्दीकींच्या पत्नीच्या वतीने विशेष सरकारी वकील महेश मुळे आणि वकील प्रदीप घरत यांनी आरोपी पारधीच्या जामीन अर्जाला तीव्र विरोध केला. पारधीने शिवकुमार आणि धर्मराज म्हणून ओळखल्या जाणार्या शूटर्सना मदत केली होती. त्याच्या भूमिकेचा पुरावा म्हणून कॉल डेटा रेकॉर्ड तसेच सहआरोपींचे कबुलीजबाब व इतर पुरावे सरकारी पक्षाने सादर केले.