गॅस, कच्च्या तेलाचा पुरवठा खंडित झाल्याने हेलियमचा तुटवडा pudhari photo
मुंबई

Helium shortage : गॅस, कच्च्या तेलाचा पुरवठा खंडित झाल्याने हेलियमचा तुटवडा

एमआरआय चाचण्यांसह आरोग्य सेवांवर परिणाम होण्याची शक्यता

पुढारी वृत्तसेवा

मुंबई : आखाती देशांकडून होणारा गॅस आणि कच्च्या तेलाचा पुरवठा खंडित झाल्याने हेलियम वायूच्या तुटवड्याची भीती निर्माण झाली आहे. याचा परिणाम आरोग्य सेवांवर, विशेषतः एमआरआय (मॅग्नेटिक रेझोनन्स इमेजिंग) चाचण्यांवर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

मुंबई आणि एमएमआर परिसरात सध्या परिस्थिती नियंत्रणात असून एमआरआय सेवा सुरू आहे. मात्र, हेलियमचा पुरवठा दीर्घकाळ पूर्ववत न झाल्यास एमआरआय सेवा प्रभावित होऊ शकतात.

एमआरआय मशीनमध्ये अत्यंत शक्तिशाली सुपरकंडक्टिंग चुंबकांचा वापर केला जातो. हे चुंबक अतिशय कमी तापमानात कार्य करतात, आणि ते तापमान टिकवण्यासाठी द्रवरूप हेलियम आवश्यक असते. त्यामुळे हेलियमचा सतत पुरवठा महत्त्वाचा ठरतो.

गॅस साठवणूक करण्याची अडचण

नानावटी मॅक्स सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमधील रेडिओलॉजी विभागाचे प्रमुख डॉ. दीपक पाटकर यांच्या मते, हेलियम हा अत्यंत हलका वायू असून तो कमी तापमानातही हळूहळू बाष्पीभवन होतो. त्यामुळे त्याची साठवणूक करणे आव्हानात्मक ठरते. दीर्घकाळ पुरवठा खंडित झाल्यास परिस्थिती गंभीर होऊ शकते.

नवीन मशीनमध्ये कमी गरज

एमएमआरमधील सुमारे 70 टक्के एमआरआय मशीन आधुनिक तंत्रज्ञानाची असून त्यांना तुलनेने कमी हेलियम लागते. तसेच, मशीनमध्ये वारंवार हेलियम भरण्याची गरज नसते.

सध्या घाबरण्याचे कारण नाही

आतापर्यंत मुंबईतील कोणत्याही निदान केंद्राने हेलियम तुटवड्याबाबत तक्रार केलेली नाही. त्यामुळे सध्या नागरिकांनी घाबरण्याची गरज नसल्याचे तज्ज्ञांनी स्पष्ट केले आहे. मात्र, भविष्यातील परिस्थिती लक्षात घेता पुरवठा साखळी सुरळीत राहणे आवश्यक आहे.

साधारणपणे एमआरआय मशीनमध्ये दर 3 ते 5 वर्षांनी एकदाच हेलियम भरावे लागते. काही नवीन मशीन तर हेलियम न भरता पाच वर्षांपर्यंत कार्यरत राहू शकतात.
डॉ. प्रशांत पाटील, माजी अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य रेडिओलॉजी असोसिएशन

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT