मुंबई : राज्यातील जनतेला आपत्कालीन परिस्थितीत हेलिकॉप्टर अॅम्ब्युलन्सची सुविधा मिळणार आहे. सुरुवातीला तीन हेलिकॉप्टर रुग्णवाहिका उपलब्ध असतील. ही सेवा शासनाच्या आपत्कालीन वैद्यकीय सेवा 108 अंतर्गत मिळणार असून ती विनामूल्य असेल. या सुविधेशिवाय आधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज असलेली रुग्णवाहिकाही समुद्रापासून रस्त्यांपर्यंत लोकांना उपलब्ध होणार आहे. पहिल्या टप्प्यात 300 हून अधिक रुग्णवाहिका आणि पाच बोट अॅम्ब्युलन्स उपलब्ध असतील. नव्या वर्षात मार्च महिन्यापासून याची सुरुवात होणार आहे.
राज्य सरकार सुमित फॅसिलिटीज लिमिटेड, इंडिया आणि स्पेनच्या एसएसजी ट्रान्सपोर्ट सॅनिटारियो एसएलच्या माध्यमातून आधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज असलेल्या 108 रुग्णवाहिका सेवा पुरवत आहे. नवीन भागीदारीनुसार 1756 नवीन रुग्णवाहिका आणण्यात येणार आहेत. एसएसजीचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुमित साळुंखे म्हणाले, 1756 रुग्णवाहिकांपैकी 255 अत्याधुनिक आहेत. अधिक चांगल्या सुविधा देण्यासाठी पुण्यात आपत्कालीन प्रतिसाद केंद्र सुरू करण्यात आले असून ते 24 तास कार्यरत राहणार आहे. फाईव्ह जी तंत्रज्ञानाने सुसज्ज असलेल्या रुग्णवाहिकेत रुग्णांच्या उपचाराशी संबंधित 25 हून अधिक उपकरणे असतील.
एखाद्या व्यक्तीने आपत्कालीन प्रतिसाद केंद्राशी संपर्क साधल्यानंतर 20 ते 30 मिनिटांच्या आत रुग्णवाहिका सेवा उपलब्ध होईल. रुग्णाची प्रकृती गंभीर असल्यास रुग्णवाहिकेच्या आधी मोटारसायकल रुग्णवाहिका घटनास्थळी पोहोचून रुग्णाला प्राथमिक उपचार देऊन प्रकृती स्थिर करण्याचा प्रयत्न केला जाईल.
लाईफ सपोर्टमध्ये 1274 बेसिक लाईफ सपोर्ट, 36 मुलांसाठी विशेष रुग्णवाहिका, 166 मोटारसायकल रुग्णवाहिका, 10 सागरी बोट रुग्णवाहिका आणि 15 नदी बोट रुग्णवाहिका यांचा समावेश आहे. या सर्व रुग्णवाहिका पाच टप्प्यात कार्यान्वित करण्यात येणार आहेत. पहिल्या टप्प्यात मार्चमध्ये 300 नवीन रुग्णवाहिका सेवेत आणण्यात येणार आहेत. यामध्ये पाच सागरी बोट रुग्णवाहिकांचा समावेश असेल. दुसर्या टप्प्यात एअर अॅम्ब्युलन्स सेवा देणे अपेक्षित आहे. या प्रकल्पासाठी सुमारे 1500 कोटी रुपये खर्च येणार आहे. यामध्ये राज्य सरकारचा वाटा 49 टक्के असणार आहे.