मुंबई : पावसाळा संपल्यामुळे मुंबईत रस्त्यांच्या कामासह विविध कामांसाठी खोदकाम करण्यास परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे पुढील आठवड्यापासून ठिकठिकाणी रस्त्याची कामे सुरू होणार असून पुन्हा मुंबईकरांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागणार आहे.
पावसाळ्यामुळे 1 जून ते 30 सप्टेंबरपर्यंत मुंबईत रस्ते व अन्य खोदकामाला पूर्णपणे बंदी होती. जलवाहिनी फुटणे विद्युत केबलमध्ये बिघाड होणे अशी महत्त्वाची कामे असल्यास पावसाळ्यात खोदकाम करण्यात परवानगी देण्यात येते. आता पावसाळा संपल्यामुळे पुन्हा खोदकामास पुन्हा परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे पुढील आठवड्यापासून भूमिगत जलवाहिन्या टाकण्यासह मलनिःसारण वाहिनी व सिमेंट काँक्रीट रस्त्याची कामे सुरू होणार आहेत. रस्त्याचे सिमेंट काँक्रीट करत असताना अर्धा रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात येतो. तर काही ठिकाणी एक दिशा मार्ग ठेवण्यात येतो. त्यामुळे ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते. त्यामुळे 15 ते 20 मिनिटांच्या प्रवासाला अनेकदा तासभर लागतो. पुढील आठवड्यापासून हा त्रास आता प्रत्येक मुंबईकराला सहन करावा लागणार आहे.
मुंबई शहर व उपनगरात 395 किमी लांबीच्या रस्त्याची कामे सुरू आहेत. यात पश्चिम उपनगरात 253 पूर्व उपनगरात 70 तर शहरात 72 किमी कामांचा समावेश आहे. यातील काही रस्त्यांची कामे अर्धवट पूर्ण झाली आहेत. पश्चिम उपनगरात सर्वाधिक रस्त्याची कामे सुरू होणार असल्यामुळे या भागात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीचा सामना नागरिकांना सहन करावा लागणार आहे.
रस्त्यांची कामे सुरू असताना कंत्राटदाराने नागरिकांच्या सुरक्षेतेला विशेष प्राधान्य दिले पाहिजे. तशा अटी व शर्ती निविदांमध्ये टाकण्यात आले आहेत. यात काम सुरू असलेल्या ठिकाणी बॅरिकेट्स लावणे, नागरिकांना चालण्यासाठी रस्ता ठेवणे, दिशादर्शक लावणे, आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवणे, व अन्य सुरक्षतेची जबाबदारी पार पाडणे आवश्यक असल्याचे पालिकेकडून सांगण्यात आले.