पुढारी ऑनलाईन डेस्क : कर्नाटक-गोवा किनाऱ्यालगत पूर्वमध्य अरबी समुद्रातील कमी दाबाचे क्षेत्र वायव्येकडे सरकण्याची शक्यता आहे. ते पुढील २-३ दिवसांत मध्य अरबी समुद्रात तीव्र (Depression) होईल. यामुळे या आठवड्यात केरळ, तामिळनाडूतील काही भागात मुसळधार पावसाची शक्यता आहे. तसेच पुढील ३ ते ४ दिवसांत कर्नाटक, गोवा, महाराष्ट्रातील घाट भाग (Maharashtra Weather), गुजरात, अरुणाचल प्रदेश, आसाम आणि मेघालयातील काही भागात मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
मुंबई शहर आणि उपनगरात आकाश अंशत: ढगाळ राहून आज सायंकाळी अथा रात्री गडगडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे.
पुढील २-३ दिवसांत गुजरात, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, बिहार, महाराष्ट्रातील आणखी काही भाग आणि झारखंडच्या काही भागांतून मान्सून माघारी परतण्यासाठी अनुकूल परिस्थिती आहे. या पार्श्वभूमीवर कोकण आणि गोव्यात जोरदार पावसाची शक्यता असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे.
दरम्यान, मान्सूननंतर अवकाळी पावसाचा मुक्काम थेट डिसेंबरपर्यंत राहण्याची शक्यता आहे. हा अवकाळी पाऊस ऑक्टोबरच्या तिसर्या आठवड्यात सुरू होण्याची शक्यता आहे. याचे कारण ला-निना तटस्थ अवस्थेतून सक्रिय अवस्थेकडे जात आहे.