मुंबई : परतीच्या पावसाने जाता जाता बुधवारी मुंबईकरांना जबर दणका दिला. हवामान खात्याने मुंबई महानगराला गुरुवारी सकाळी ८.३० पर्यंत अतिमुसळधार पावसाचा रेड अलर्ट दिला आहे. परिणामी, मुंबई, ठाणे आणि पालघरच्या सर्व शाळा- महाविद्यालयांना आज सुट्टी जाहीर करण्यात आली असून, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनाही ही सुट्टी लागू राहील.
काल संध्याकाळी वेगवान वाऱ्यांसह कोसळणाऱ्या या पावसाने विद्याविहार, मुलुंड, भाडुप, नाहुर, कांजूरमार्ग, विक्रोळी, कुर्ला स्थानकांत पाणी भरले व लोकलची सेवा कोलमडली, ऐन संध्याकाळी घरी परतणाऱ्या मुंबईकरांचे प्रचंड हाल झाले. राज्यासह महामुंबई प्रदेशात अतिवृष्टीचे संकट घोंगावत असल्याने गुरुवारी परिस्थिती आणखी बिकट होऊ शकते. मुंबईकरांनीही गरज असेल तरच बाहेर पडावे, असे आवाहन महापालिकेने केले आहे.
दोन दिवसांपासून मुंबईसह राज्यात परतीचा पाऊस सुरू झाला, मंगळवारी रात्री उशिरा या पावसाने दिलेला तडाखा फारसा लक्षात आला नाही. विजांच्या कडकडाटात तो पहाटेपर्यंत बरसत राहिला. बुधवारची सकाळही तुरळक सरीमध्येच चिंब होऊन उजाडली. संध्याकाळी काय वाढून ठेवले आहे याचा अंदाज दुपारपर्यंत नव्हता. संध्याकाळी ५ वाजताच मुंबईत अंधार पसरला आणि हा निरोपाचा पाऊस सूड घेतल्यागत बरसू लागला. संध्याकाळच्या तीन तासांत मुंबईची तुंबई झाली आणि धावणारी मुंबई अनेक सखल भागात मंदावली. सर्वत्र वाहनाच्या रांगा लागल्या. मध्य रेल्वे मार्गावरील कुर्ला, विद्याविहार, मुलुंड, भाडंप, नाहुर, कांजूरमार्ग, विक्रोळी स्थानकात रुळावर पाणी शिरल्याने रात्री साठे आठच्या सुमारास लोकल ठप्प झाली. अप आणि डाउन धिम्या मार्गावरील लोकलचे वेळापत्रक कोलमडले. घरी जाण्यासाठी निघालेले मुंबईकर लोकलमध्ये, स्थानकांवर आणि बस स्टॉपवर अडकून पडले. पावसाचा जोर वाढत असल्याने रखडलेल्या लोकलमधून उतरुन पायी चालत जाणे देखील शक्य नसल्याने प्रवाशांनी लोकलमध्येच बसून राहणे पसंत केले.
रात्री साडे आठ वाजता फक्त विद्याविहार ते सीएसएमटी दरम्यानची लोकल वाहतूकच सुरु होती. विद्याविहार ते ठाणे- कल्याणच्या दिशेकडील वाहतूक विस्कटली होती. रुळांवर आलेले पाणी पाहता खबरदारीचा उपाय म्हणून रेल्वे प्रशासनाने कांजूरमार्ग ते विक्रोळी दरम्यान अप आणि डाउन मार्गावरील लोकल प्रति तास ३० किमीच्या वेगाने चालविण्याचा निर्णय घेतला. त्यात गाड्या एकामागोमाग एक रखडल्या. पश्चिम रेल्वे मार्गावरील लोकल २० ते २५ मिनिटे विलंबाने धावत होत्या.
राज्यात सलग तिसऱ्या दिवशी राज्यभर मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचे धूमशान सुरूच आहे. विशेषतः, कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात मुसळधार पाऊस पडत आहे. विदर्भातही पावसाचा जोर कायम आहे. दरम्यान, विजांचा कडकडाट, वादळी वारे आणि मेघगर्जनेमुळे पावसाची तीव्रता वाढली आहे. शनिवारपर्यंत पावसाचा जोर कायम राहील. त्यानंतर मात्र पाऊस हळूहळू कमी होत जाईल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. बंगालच्या उपसागरातील मध्य-पूर्व आणि उत्तर-पूर्व भागापासून ते आंध्र प्रदेश, पुढे दक्षिण ओडिशापर्यंत कमी दाबाचा पट्टा कार्यरत होता. आता मात्र त्याची तीव्रता कमी झाली आहे. तसेच, मान्सूनचा परतीचा प्रवास सध्या फिरोजपूर, सिरसा, अजमेर, माऊंट आबू, दिसा, सुरेंद्रनगर, जुनागड या भागापर्यंत येऊन पोहोचला आहे. त्यातच सध्या उत्तर कोकण ते बांगला देश पार करून पुढे दक्षिण छत्तीसगडपर्यंत द्रोणीय स्थिती आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र अतिमुसळधार, मराठवाडा मुसळधार, तर विदर्भातही पावसाचा जोर चांगलाच राहणार आहे.