मुंबईवर मान्सून ‘स्ट्राईक’! Pudhari File Photo
मुंबई

Mumbai Rain : मुंबईवर मान्सून ‘स्ट्राईक’!

अकस्मात धडकलेल्या मान्सूनने झोपेतून उठवले; लवकर येण्याचा विक्रम अन् मेमध्ये बरसण्याचाही विक्रम

पुढारी वृत्तसेवा

मुंबई : सोमवारी सकाळी मुंबईकर धुवाधार पावसातच जागे झाले आणि मान्सूनच्या आगमनाचे स्वागत करावे की तुंबलेल्या मुंबईतून वाट काढत ऑफिसला पोहोचावे, अशा संकटात सापडले. रात्रभर धोधो कोसळलेल्या पावसाने मुंबई ठिकठिकाणी तुंबली, पश्चिम व मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प पडली, हार्बरही रखडली आणि वाहतूक कोंडीत मुंबईकर अडकून पडले. काही दिवसांपूर्वी उद्घाटन झालेल्या भुयारी मेट्रोमध्येही पाणी शिरले. जलरोधक भिंतच कोसळल्याने आचार्य अत्रे भुयारी स्थानकात दलदल निर्माण झाली. वरळी ते आचार्य अत्रे चौक मेट्रो तूर्त स्थगित करण्यात आली आहे. तुंबलेल्या मुंबईत आता सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात चिखलफेक सुरू झाली असून, मुंबईची तुंबई होण्यास अचानक आलेला आणि विक्रमी बरसलेला मान्सूनच जबाबदार असल्याचे सत्ताधार्‍यांनी म्हटले आहे. हवामान खात्याच्या माहितीनुसार, दक्षिण मुंबईत कधी नव्हे तो विक्रमी पाऊस पडला. नरिमन पॉईंट परिसरात सकाळी 11 वाजेपर्यंत तब्बल 252 मिमी, तर फोर्ट परिसरात 216 मिमीपेक्षा जास्त पावसाची नोंद झाली.

यंदा मुंबई तुंबणार नाही हे निव्वळ राजकीय आश्वासन ठरले. मध्य रात्रीपासूनच्या पावसाने सकाळी 10 पर्यंत जणू मुंबई रोको आंदोलन छेडले. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते मस्जिद बंदर, माटुंगासह अनेक ठिकाणी रुळांवर पाणी आल्याने पश्चिम रेल्वे, मध्य रेल्वे रखडली. हार्बरचाही दिलासा उरला नाही. रस्त्याने जावे तर नेहमीच्या ठिकाणी तुंबणारी मुंबई जणू नियोजन केल्याप्रमाणे तुंबलेली होती. सायन, गांधी मार्केट, हिंदमाता, माटुंगा परिसरातील रस्ते पाण्याने अडवून धरले आणि बदललेल्या, वळवलेल्या रस्त्यांनी एरव्ही धावणारी मुंबई रांगत रांगत सरकू लागली.

मुंबईत तसा आठवडाभरापासून अवकाळी पाऊस कोसळतो आहे. केरळातून गोवामार्गे रविवारी तळ कोकणात दाखल झालेल्या मान्सूनने मध्यरात्री आणखी वेग पकडला आणि तो मुंबईकर झोपेत असतानाच मुंबईवर धडकला. अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे 50 ते 60 किलोमीटर ताशी वेगाने वाहणार्‍या वार्‍यांसह दाखल झालेल्या मान्सूनने मुंबईच्या काळजाचे ठोके चुकवले आणि त्याचा अवतार पाहून अनेकांना 26 जुलै 2005 च्या महाप्रलयाची आठवण झाली. उपनगरापेक्षा दक्षिण मुंबई व परिसरात पावसाचा जोर प्रचंड होता. नरिमन पॉईंट, फोर्टमध्ये तर आभाळ फाटल्यागत पाऊस कोसळत राहिला. नरिमन पॉईंट, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, कुलाबा, दोन टाकी या भागांत अत्यंत कमी वेळेत सकाळी 11 वाजेपर्यंत विक्रमी पाऊस पडला. मंत्रालयाच्या परिसरात देखील प्रथमच पाणी तुंबले. सकाळी चर्चगेट, सीएसएमटी स्टेशनवर उतरलेल्या चाकरमान्यांना ओलेचिंब होऊनच वाहतूक कोंडीतून कशीबशी वाट काढत कार्यालय गाठावे लागले.

मध्य मुंबईतही ठिकठिकाणी पाणी तुंबून जनजीवन विस्कळीत झाले. दक्षिण मुंबईकडे येणारे जवळपास सर्वच रस्ते वाहतूक कोंडीत अडकल्यामुळे मुंबईकरांचा प्रवास लांबला. शक्कर पंचायत, सायन सर्कल, दादर टीटी, हिंदमाता, जे. जे. मडवी पोस्ट ऑफिस व शहरातील काही भागात मोठ्या प्रमाणात पाणी तुंबले होते. शहरात पावसाचा जोर इतका होता की, घराबाहेर पडणे शक्य नव्हते. पश्चिम उपनगरांत सांताक्रुझ, वांद्रे, पूर्व उपनगरांत चेंबूर, कुर्ला, गोवंडी, आदी भागातही मुसळधार वृष्टी झाली आणि जनजीवनही तुंबले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT