मुंबई/पुणे : अरबी समुद्रात तब्बल १५ दिवस रेंगाळल्यानंतर मान्सूनने आता संपूर्ण राज्यात दमदार हजेरी लावली आहे. रखडलेल्या पेरण्यांना वेग आल्याने बळीराजा सुखावला आहे. मुंबई आणि उपनगरांमध्ये सलग तिसऱ्या दिवशी मुसळधार पाऊस सुरू असल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. हवामान विभागाने रायगड आणि पुण्याला ‘रेड अलर्ट’ तर मुंबई, ठाणे आणि पालघरला ‘ऑरेंज अलर्ट’ जारी केला असून नागरिकांना अत्यंत महत्त्वाच्या कामाशिवाय घराबाहेर न पडण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. जुलैच्या पहिल्याच दिवसापासून सुरू झालेल्या या दमदार पावसामुळे राज्यातील रखडलेल्या पेरणीच्या कामांना आता गती आली आहे. गेल्या दोन दिवसांपासून रात्रभर कोसळणाऱ्या पावसामुळे मुंबईच्या सखल भागात पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे.
कोकण, मध्य महाराष्ट्राला सोमवारपर्यंत ‘रेड अलर्ट’
कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भाला ६ जुलैपर्यंत अतिवृष्टीचा ‘रेड अलर्ट’ देण्यात आला आहे. मराठवाड्यात मात्र हलका ते मध्यम पावसाचा अंदाज आहे. राज्यात शुक्रवारी (दि. ३) बहुतांश भागात संततधार पावसाची नोंद झाली, तर कोकणासह मुंबई आणि घाटमाथ्यावर अतिवृष्टीची नोंद झाली. राज्यात सोमवार (६ जुलै) पर्यंत जोरदार पावसाचा अंदाज आहे. कोकणात ९ जुलै, मध्य महाराष्ट्राला ६ जुलै, तर विदर्भाला ८ जुलैपर्यंत मुसळधारेचा अंदाज देण्यात आला आहे.
असे आहेत अलर्ट
- आजपासून पुढील आठवडाभर (८ जुलैपर्यंत) मुंबईसह संपूर्ण कोकण, विदर्भ, खानदेश, नाशिक, पुणे, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड जिल्ह्यांत मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता आहे.
- कोकणातील पालघर, ठाणे, मुंबईसह रायगड, रत्नागिरी तसेच नाशिक, पुणे, सातारा, काेल्हापूर या जिल्ह्यांतील घाट (त्र्यंबकेश्वर, घोटी, इगतपुरी, कसारा, भंडारदरा, भीमाशंकर, लोणावळा, खंडाळा, मावळ, मुळशी, वेल्हे, भोर, ताम्हिणी, नाणेघाट, पोलादपूर, महाबळेश्वर, पाचगणी, कुंभार्ली घाट, कोयना, आंंबा, गगनबावडा, राधानगरी) क्षेत्रांत जोरदार पावसाचा अंदाज आहे.
करूळ घाटात दरड कोसळली; दोन तास वाहतूक ठप्प
कोल्हापूर आणि सिंधुदुर्गला जोडणार्या करूळ घाटात शुक्रवारी दुपारी १२.३०च्या सुमारास भली मोठी दरड कोसळल्याने या मार्गावरील वाहतूक सुमारे दोन तास पूर्णपणे ठप्प झाली. दोन्ही बाजूंनी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याने प्रवाशांचे मोठे हाल झाले.
आंबा घाटात पुन्हा दरड कोसळली; एक मार्गिका बंद
सततच्या मुसळधार पावसामुळे संगमेश्वर तालुक्यातील आंबा घाटात शुक्रवारी सकाळी पुन्हा मोठी दरड कोसळल्याने रत्नागिरी-नागपूर महामार्गावरील वाहतूक काही काळ मंदावली.
आंबोलीच्या वर्षा पर्यटनाला प्रारंभ
गेले चार दिवस कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे आंबोलीचा मुख्य धबधबा आता पूर्ण क्षमतेने कोसळू लागला आहे. याबरोबरच घाटमार्ग व परिसरातील सर्वच धबधबे प्रवाहित झाले आहेत. या पार्श्वभूमीवर येणाऱ्या ४ जुलै या पहिल्या शनिवारपासून आंबोलीच्या वर्षा पर्यटनास प्रारंभ होत आहे.
पावसाने भरलेल्या खड्ड्यात चिमुकल्याचा बुडून अंत
कंत्राटदाराच्या निष्काळजीपणामुळे दोन वर्षांच्या निष्पाप चिमुकल्याला जीव गमवावा लागल्याची हृदयद्रावक घटना पुणे जिल्ह्यातील लोणी काळभोर परिसरात घडली आहे. घरासमोर खेळत असताना पावसाच्या पाण्याने भरलेल्या उघड्या खड्ड्यात पडून सोहम लखन कसबे (वय २) या चिमुकल्याचा मृत्यू झाला. काम सुरू असतानाही त्या खड्ड्यांभोवती बॅरिकेडस्, संरक्षक जाळी किंवा धोक्याचा इशारा देणारे फलक नव्हते.
जगबुडी नदीने ओलांडली इशारा पातळी
खेड : कोकणात सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा परिणाम आता जिल्ह्यातील प्रमुख नद्यांवर दिसून येत असून खेड तालुक्यातून वाहणाऱ्या जगबुडी नदीच्या पाणी पातळीत सातत्याने वाढ होत आहे. नदीने इशारा पातळी ओलांडली असून ती धोक्याच्या पातळीकडे वेगाने वाटचाल करत असल्याने नदीकाठच्या गावांमध्ये सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.