Weather Forecast
राज्यातील 'या' भागांत पावसाचा जोर वाढणार File Photo
मुंबई

Weather Forecast | ठाणे, मुंबईसह दक्षिण महाराष्ट्रात मुसळधार

मोनिका क्षीरसागर

मुंबई; केरळ ते कोकण किनारपट्टीवर कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्यामुळे कोकण अन् घाटमाथ्यावर पावसाचा जोर वाढला आहे. ठाणे, पालघर जिल्ह्यात पावसाने हाहाकार माजवला असून प्रशासनाने बचावकार्य हाती घेतले आहे. गेल्या २४ तासांत माथेरानमध्ये २२० मि.मी. पाऊस झाल्याने हंगामातील सर्वाधिक पावसाची नोंद तेथे झाली आहे.

विदर्भात सर्वदूर पावसाने हजेरी लावली. मध्य महाराष्ट्र अन् मराठवाड्यात मात्र पावसाचा जोर कमी आहे. दरम्यान, गोव्यात शिवलिंग धबधब्यावर फिरायला आलेल्या १५० पर्यटकांसह स्थानिकांना वाचविण्यात आले.

समुद्रसपाटीवरील कमी दाबाचा पट्टा दक्षिण गुजरात ते उत्तर केरळ किनारपट्टीपर्यंत आहे. त्यामुळे गेल्या २४ तासांत कोकणात तुरळक ठिकाणी अतिवृष्टी झाली. त्यात माथेरानमध्ये २२० मि.मी. तर रत्नागिरी, राजापूर, पनवेल, फोंडा, कर्जतमध्ये १५० ते १२० मि.मी. पाऊस झाला आहे. घाटमाथ्यावर गगनबावडा १७९, तर लोणावळामध्ये १३१ मि.मी. पावसाची नोंद गेल्या २४ तासांत झाली. मात्र उर्वरित राज्यात तुरळक ठिकाणी मुसळधार; तर बहुतांश भागात हलका ते मध्यम पाऊस झाला. सोमवारी ८ जुलै रोजीही कोकण, घाटमाथा आणि विदर्भात अतिवृष्टीचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे.

शहापूरला ४९ जणांना वाचवले; ठाण्यात इमारतीचा भाग कोसळला

शहापूर : शहापूरमधून वाहत जाणाऱ्या भारंगी नदीला पूर आल्याने नजीकच्या गुजराती बागेतील घरांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी शिरले; तर पार्किंगमधील ८ ते १० चारचाकी तर २५ दुचाकी वाहने पुराच्या पाण्यात वाहून गेली. एनडीआरएफची टीम तत्काळ दाखल झाली. सृष्टी फार्म व पाठारे नर्सरी या ठिकाणाहून ४९ जणांना एनडीआरएफ टीमने रेस्क्यू करून सुरक्षित ठिकाणी आणले गेले, तर जीवरक्षक टीमचे प्रदीप गायकर यांना अडकलेल्या १० लोकांना घरातून काढण्यात यश आले. ठाणे शहरात अतिधोकादायक यादीत समाविष्ट असलेल्या जांभळी नाका, कडवा गल्लीतील पांडे हाऊस या रिकामी असलेल्या इमारतीचा जीर्ण झालेला काही भाग रस्त्यावर रविवारी सकाळी कोसळला; तर उर्वरित इमारत अत्यंत धोकादायक स्थितीमध्ये आहे. सुदैवाने यामध्ये कोणतीही दुखापत झालेली नाही.

वसईत १६ शेतकऱ्यांना सुखरूप बाहेर काढले

पालघर : वसई तालुक्यातील पूर्व ग्रामीण भागात आता भातशेती लागवडीला जोर आला आहे. वरच्या भागात मुसळधार पाऊस झाल्याने पाण्याच्या लोंढ्यामुळे तानसा नदीला पूर आला. काही कळायच्या आत किनाऱ्याच्या परिसरातील शेतीत पाणी घुसून परिसरातील शेती पाण्याखाली गेली. अचानक आलेल्या या लोंढ्यात शेतात काम करणारे उसगावातील १६ शेतकरी अडकून पडले होते.

एनडीआरएफ टीमने ८ स्त्रिया व ८ पुरुष अशा सर्वांना सुखरूपपणे बाहेर काढले. त्यांना कुठल्याही प्रकारची इजा झालेली नाही. गोव्यात धबधब्यावर गेलेल्या

१५० पर्यटकांना वाचवले

वाळपई : गोव्यात मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून पावसाने कहर केला आहे. सत्तरी तालुक्यातील पाली येथील शिवलिंग धबधब्यावर फिरायला आलेल्या १५० पर्यटकांसह स्थानिकांना वाचविण्यात आले. हे पर्यटक नदी ओलांडून धबधब्यावर गेले होते. मात्र अचानक नदीची पाणी पातळी वाढल्यामुळे नदीचा प्रवाह गतीने वाढू लागला. त्यामुळे पर्यटकांना नदी ओलांडता येत नसल्यामुळे ते अडकले. सुमारे ३ तास बचाव कार्य सुरू होते.

कल्याण-कसारा रेल्वेसेवा सहा तास ठप्प

कसारा रात्रभर पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे आटगाव रेल्वे स्थानकाच्या पुढे रेल्वे ट्रॅकवर झाड पडल्याने कसाऱ्याकडे जाणारी वाहतूक ठप्प होती. कल्याण कसारा रेल्वे मार्ग तब्बल ६ तासांनंतर सुरळीत धिम्या गतीने सुरू झाला.

पंचगंगा पात्राबाहेर ५० बंधारे पाण्याखाली; १४ धरण क्षेत्रांत अतिवृष्टी

कोल्हापूर : शहरासह जिल्ह्यात सर्वदूर मुसळधार पाऊस सुरू आहे. धरण क्षेत्रात सुरू असलेल्या धुवाँधार पावसामुळे पंचगंगेच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ झाल्याने रविवारी सकाळी यावर्षी प्रथमच पंचगंगा पात्राबाहेर पडली. गेल्या २४ तासांत तुळशी, कुंभी, पाटगाव, चित्री, जंगमहट्टी, जांबरे, सर्फनाल, कोदे या धरण क्षेत्रांमध्ये अतिवृष्टी झाली. घटप्रभा येथे २०० मि.मी. पाऊस झाला. पावसामुळे जिल्ह्यातील ५० बंधारे पाण्याखाली गेले आहेत. शहरात सुरू असलेल्या पावसामुळे रात्री ८ च्या सुमारास वाय. पी. पोवारनगरकडून हुतात्मा पार्ककडे जाणाऱ्या मार्गावर मोठे झाड उन्मळून पडले. यामुळे या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. जिल्ह्यात सुरू असलेल्या पावसामुळे राधानगरी तालुक्यातील राशिवडे व मोहडे येथे घरावर दरड कोसळण्याची घटना घडली आहे. मोहडे येथे चंद्रकांत पांडुरंग पाटील यांच्या तर राशिवडे येथे बाळू दगडू जोग यांच्या घरावर कोसळली आहे. यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. कोल्हापुरात शनिवारी रात्रीपासून पावसाने जोर धरला आहे. रविवारी सकाळी हवामान विभागाने कोल्हापूर जिल्ह्याला मुसळधार पावसाचा अलर्ट दिला.

SCROLL FOR NEXT