तरुणांमध्ये वाढतोय अचानक मृत्यूचा धोका!  Pudhari
मुंबई

Heart Attack : तरुणांमध्ये वाढतोय अचानक मृत्यूचा धोका!

‌‘एम्स‌’च्या अभ्यासातून अनभिज्ञ असणाऱ्या हृदयविकाराबाबत धक्कादायक खुलासा

पुढारी वृत्तसेवा

मुंबई/नवी दिल्ली : अचानक होणारे मृत्यू आता केवळ वृद्धांपुरते मर्यादित राहिलेले नाहीत. एका वर्षाच्या कालावधीत तपासलेल्या एकूण आकस्मिक मृत्यूंपैकी निम्म्याहून अधिक मृत्यू हे 45 वर्षांपेक्षा कमी वयाच्या व्यक्तींमध्ये झाले आहेत. धक्कादायक म्हणजे, यातील अनेकजण दिसायला पूर्णपणे निरोगी होते आणि घरी किंवा प्रवासात असताना त्यांना अचानक मृत्यूने गाठले, अशी बाब अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेच्या (एम्स) एका ताज्या अभ्यासात समोर आली आहे.

‌‘इंडियन जर्नल ऑफ मेडिकल रिसर्च‌’मध्ये प्रकाशित झालेल्या या अभ्यासात मे 2023 ते एप्रिल 2024 दरम्यान झालेल्या 2,214 शवविच्छेदनांचा अभ्यास करण्यात आला. यापैकी 180 प्रकरणे (8.1 टक्के) आकस्मिक मृत्यूची होती. चिंताजनक बाब म्हणजे, या 180 प्रकरणांपैकी 103 प्रकरणे (57.2 टक्के) ही 18 ते 45 वयोगटातील तरुणांची होती. या तरुणांचे सरासरी वय 33.6 वर्षे होते आणि यात पुरुषांचे प्रमाण अधिक होते.

हृदयविकार हे प्रमुख कारण

अभ्यासानुसार, तरुणांमधील आकस्मिक मृत्यूसाठी हृदयविकार हे सर्वात प्रमुख कारण ठरले आहे. या वयोगटातील 42.6 टक्के मृत्यू हे हृदयाशी संबंधित आजारांमुळे झाले. अनेकांना हृदयवाहिन्यांमध्ये गंभीर अडथळे होते; परंतु त्यांना या आजाराबद्दल कोणतीही पूर्वकल्पना नव्हती. याशिवाय, श्वसनसंस्थेचे आजार (उदा. न्यूमोनिया, टीबी) हेदेखील मृत्यूचे एक प्रमुख कारण होते. सुमारे 20 टक्के प्रकरणांमध्ये मृत्यूचे नेमके कारण शवविच्छेदन करूनही स्पष्ट होऊ शकले नाही, जे आनुवंशिक हृदयरोगाकडे संकेत देतात.

कोरोना किंवा लसीकरणाशी संबंध नाही

या अभ्यासात एक महत्त्वाची बाब स्पष्ट झाली आहे की, तरुणांमधील आकस्मिक मृत्यूंचा कोरोना संसर्ग किंवा लसीकरणाशी कोणताही ठोस संबंध आढळलेला नाही. तज्ज्ञांनीही याला दुजोरा दिला असून, लसीकरणामुळे हृदयविकाराचा धोका वाढत असल्याच्या चर्चांना कोणताही शास्त्रीय आधार नसल्याचे म्हटले आहे. धूम्रपान आणि मद्यपान यासारख्या जीवनशैलीच्या सवयी मात्र मृत्यूच्या प्रमुख जोखमींपैकी एक असल्याचे दिसून आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT