Harshvardhan Sapkal  
मुंबई

Harshvardhan Sapkal | काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ ॲक्शन मोडवर; प्रत्येक आमदाराचे 'रिपोर्ट कार्ड' करणार तयार

Harshvardhan Sapkal | अधिवेशनातील पक्षाच्या आमदारांच्या कामगिरीवर ते नाराज असून, प्रत्येक आमदाराचे आता 'रिपोर्ट कार्ड' तयार करण्याची प्रक्रिया त्यांनी स्वतः हाती घेतली आहे.

shreya kulkarni

Harshvardhan Sapkal

मुंबई: नुकतेच संपलेले पावसाळी अधिवेशन विरोधकांच्या ढिसाळ कामगिरीमुळे गाजले. सभागृहात आणि सभागृहाबाहेरही विरोधकांमध्ये एकजूट दिसली नाही, ही चर्चा सुरू असतानाच काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी आता आक्रमक भूमिका घेतली आहे. अधिवेशनातील पक्षाच्या आमदारांच्या कामगिरीवर ते नाराज असून, प्रत्येक आमदाराचे आता 'रिपोर्ट कार्ड' तयार करण्याची प्रक्रिया त्यांनी स्वतः हाती घेतली आहे.

सरकारच्या विरोधात आवाज उठवण्यात कोण कमी पडले, याचा हिशोब आता घेतला जाणार असल्याने पक्षाच्या आमदारांमध्ये खळबळ उडाली आहे.

यंदाच्या पावसाळी अधिवेशनात सत्ताधाऱ्यांना घेरण्यात विरोधक कमी पडल्याचे चित्र स्पष्ट दिसले. विधानसभेच्या पायऱ्यांवरील आंदोलन असो किंवा सभागृहातील चर्चा, विरोधी पक्षांमध्ये समन्वयाचा अभाव प्रकर्षाने जाणवला. अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर सरकारला धारेवर धरण्याची संधी असतानाही विरोधक विखुरलेले दिसले.

याच पार्श्वभूमीवर, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी पक्षाच्या आमदारांची झाडाझडती घेण्याचा निर्णय घेतला आहे. यापुढे केवळ बैठका घेऊन सूचना देण्याऐवजी थेट कामगिरीच्या आधारे मूल्यमापन केले जाणार आहे.

रिपोर्ट कार्डमध्ये काय असणार?

हर्षवर्धन सपकाळ स्वतः प्रत्येक आमदाराच्या अधिवेशनातील कामगिरीचा अहवाल तयार करणार आहेत. या अहवालात खालील मुद्द्यांवर विशेष लक्ष दिले जाणार आहे:

  • प्रश्न आणि लक्षवेधी: आमदाराने सभागृहात किती प्रश्न विचारले आणि किती लक्षवेधी सूचना मांडल्या?

  • चर्चेतील सहभाग: विविध चर्चांमध्ये आमदाराने किती तास सहभाग घेतला आणि किती प्रभावीपणे मुद्दे मांडले?

  • सरकारविरोधी भूमिका: सर्वात महत्त्वाचे म्हणजे, सरकारच्या धोरणांवर टीका करताना किंवा जनहिताच्या मुद्द्यांवर आवाज उठवताना आमदार किती आक्रमक होते?

  • सभागृहातील उपस्थिती: आमदाराची सभागृहातील एकूण उपस्थिती आणि कामकाजातील गांभीर्य.

या 'रिपोर्ट कार्ड'च्या माध्यमातून केवळ निष्क्रिय आमदारांना समज दिली जाणार नाही, तर भविष्यातील जबाबदारी वाटप आणि पक्ष संघटनेतील बदलांसाठी देखील हा अहवाल महत्त्वाचा ठरणार असल्याचे मानले जात आहे. सपकाळ यांच्या या कठोर भूमिकेमुळे काँग्रेसच्या आमदारांना आता आपले काम सिद्ध करण्याचे आव्हान उभे राहिले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT