पुढारी ऑनलाईन डेस्क
काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष म्हणून विदर्भातील हर्षवर्धन सपकाळ यांची निवड करण्यात आली. दिल्ली येथून काँग्रेसकडून गुरुवारी सांयकाळी सपकाळ यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. कोल्हापूरातील काँग्रेस नेते सतेज पाटील, सांगलीचे विश्वजीत कदम यांची नावेही प्रदेशाध्यक्षपदासाठी चर्चेत होती. पण अखेर सर्व चर्चांना पूर्णविराम देऊन काॅंग्रेसकडून हर्षवर्धन सपकाळ यांच्या नावाला पसंती मिळाली. नाना पटोले यांचा राजीनामा मंजूर केल्यानंतर आज अ.भा.काॅंग्रेस कमेटीचे सरचिटणीस के.सी.वेणूगोपाल यांच्या स्वाक्षरीने सपकाळ यांना नियुक्ती पत्र देण्यात आले .
काँग्रेस अध्यख मल्लिकार्जून खर्गे यांनी सपकाळ यांच्या नावाची घोषणा केली. सपकाळ हे विदर्भातील काँग्रेसचे नेते आहेत. तसेच ते विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या जवळचे मानले जातात. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला दारुण पराभवाला सामोरे जावे लागले. या पराभवानंतर नाना पटोले यांनी पक्ष नेतृत्वाकडे पदमुक्त करा, असे गाऱ्हाणे घातले होते. दरम्यान, दोन दिवसांपूर्वी नाना पटोले यांनी राहुल गांधींची भेट घेतली. या भेटीमध्ये प्रदेशाध्यक्षपदी नव्या आणि तरुण चेहऱ्याला संधी द्या, अशी मागणी नाना पटोले यांनी केली होती.
सर्वोदयी विचाराचे हर्षवर्धन सपकाळ हे काँग्रेसचे निष्ठावान नेते म्हणून राहूल गांधी यांच्या निकटच्या वर्तूळातील समजले जातात. २०१४ ते २०१९ मध्ये ते बुलढाण्याचे आमदार होते. त्यांचा जन्म 31 ऑगस्ट 1968 रोजीचा आहे. त्यांची शैक्षणिक पात्रता बी.कॉम, बी.पी. एड.असून शेती, समाजकारणात त्यांना रुची आहे.
गांधी तथा विनोबा यांच्या विचारधारेवर आधारित ग्राम-स्वराज , सर्वोदय विचारांवर आधारित राष्ट्रनिर्माण युवक शिबिरे, ग्रामस्वच्छता अभियान तथा आदर्श ग्राम चळवळीत त्यांचे सक्रिय योगदान राहिले आहे. आदिवासी समुदायाचे तथा गावांचे सक्षमीकरण इत्यादी कार्यात त्यांचे काम लक्षणीय आहे.
सपकाळ हे सध्या राजीव गांधी पंचायत राज संगठनचे विद्यमान राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. त्यांनी ज्येष्ठ पक्ष निरिक्षक म्हणून 2024 ओडिसा लोकसभा/विधानसभेसाठी काम पाहिले आहे. अ.भा.काँ.कमेटी नवी दिल्ली राष्ट्रीय सचिव म्हणून काम पाहिले आहे. ते जिल्हा परिषद बुलढाणाचे 1997 से 2006 या काळात सदस्य होते.