Harry Boxer Pudhari
मुंबई

Harry Boxer: लॉरेन्स बिश्नोई टोळीचा हस्तक हॅरी बॉक्सर अमेरिकेत जेरबंद! रोहित शेट्टी यांच्या घरावरील गोळीबाराची स्वीकारली होती जबाबदारी

राजस्थानमधील हरिचंद जाट याला कॅलिफोर्नियात ताब्यात घेतल्याची सूत्रांची माहिती; भारतात आणण्यासाठी प्रत्यार्पणाची प्रक्रिया सुरू होण्याची शक्यता.

पुढारी वृत्तसेवा

मुंबई: कुख्यात गुंड लॉरेन्स बिश्नोई टोळीचा प्रमुख हस्तक हॅरी बॉक्सर याला अमेरिकेत ताब्यात घेण्यात आल्याचे सूत्राकडून सांगण्यात आले. परदेशातून गुन्हेगारी कारवायांचे सूत्रसंचालन करणारा राजस्थानमधील हॅरी बॉक्सर याचे मूळ नाव हरिचंद जाट आहे. बॉक्सिंगचे प्रशिक्षण घेतल्याने त्याला हॅरी बॉक्सर हे नाव पडले. २०२२ पासून तो अमेरिकेत असल्याची माहिती आहे.

चित्रपट दिग्दर्शक रोहित शेट्टी यांच्या मुंबईतील जुहू येथील निवासस्थानावर झालेल्या गोळीबाराची जबाबदारी स्वीकारल्याने हॅरी बॉक्सर तपास यंत्रणांच्या रडारवर होता. अमेरिकेतील कॅलिफोर्निया येथे ही कारवाई करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. त्याला भारतात आणण्यासाठी प्रत्यार्पणाची प्रक्रिया सुरू होण्याची शक्यता आहे.

हॅरी बॉक्सर हा लॉरेन्स बिश्नोई टोळीच्या परदेशातील संपर्क आणि खंडणीवसुलीच्या कारवायांमध्ये सक्रिय असल्याचा तपास यंत्रणांना संशय आहे. भारतातील विविध राज्यांमध्ये त्याच्याविरोधात हत्या, हत्येचा प्रयत्न, गोळीबार आणि खंडणीचे गुन्हे दाखल असल्याचे सांगितले जाते. दिल्ली पोलिसांचा विशेष कक्ष आणि हरियाणा विशेष कृती दलाच्या माहितीच्या आधारे अमेरिकेत ही कारवाई झाल्याचे समजते.

रोहित शेट्टीच्‍या घरावरील गोळीबाराने चर्चेत

१ फेब्रुवारी २०२६ रोजी मुंबईतील जुहू परिसरात दिग्दर्शक रोहित शेट्टी यांच्या निवासस्थानाबाहेर दुचाकीवरून आलेल्या हल्लेखोराने गोळीबार केला होता. या घटनेत पाच गोळ्या झाडण्यात आल्या होत्या.

या गोळीबारानंतर सोशल मीडियावर लॉरेन्स बिश्नोई टोळीशी संबंधित खात्यावरून हल्ल्याची जबाबदारी स्वीकारण्यात आली होती. त्यात हॅरी बॉक्सरचे नाव पुढे आले होते. या घटनेमुळे चित्रपटसृष्टीतील कलाकारांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला होता.

हॅरी बॉक्सरच्या अटकेमुळे बिश्नोई टोळीचे परदेशातील जाळे, आर्थिक व्यवहार आणि भारतातील गुन्हेगारी कारवायांमधील सूत्रधारांची माहिती मिळण्याची शक्यता आहे.

बॉलीवूडला धमकावण्याचे सत्र

रोहित शेट्टी यांच्याबरोबरच अभिनेता रणवीर सिंह यालाही २० कोटी रुपयांच्या खंडणीसाठी धमकावल्याचा आरोप हॅरी बॉक्सरवर आहे. अभिनेता तुषार कपूर याच्याकडे पाच कोटी रुपयांची खंडणी मागितल्याच्या प्रकरणातही हॅरी बॉक्सरचे नाव चर्चेत आले होते. मात्र, या धमकीच्या फोनमागे प्रत्यक्षात त्याचाच सहभाग होता का, याची स्वतंत्र पडताळणी होणेबाकी आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT