सीबीआय पथकासह फरार असलेला आरोपी हरनेक सिंग. pudhari photo
मुंबई

Harnek Singh arrested : १३ वर्षांपासून फरार आरोपी हरनेक सिंगला अटक

सिंगापूर फसवणूक प्रकरण; अमेरिकेतून भारतात आणले; लूकआऊट सर्क्युलर होते जारी

पुढारी वृत्तसेवा

मुंबई : सिंगापूरमध्ये वास्तव्यास असलेल्या भारतीयांची फसवणूक केल्याच्या प्रकरणात २०१३ पासून फरार असलेला आरोपी हरनेक सिंग याला केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) अखेर अटक केली आहे. अमेरिकेतून त्याला भारतात परत आणण्यात आले असून, ९ सप्टेंबर रोजी दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर दाखल होताच सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी त्याला ताब्यात घेतले. त्याच्याविरुद्ध इंटरपोलची रेड नोटीस आणि लूकआऊट सर्क्युलर (एलओसी) जारी करण्यात आले होते.

सीबीआयने २०१६ मध्ये या प्रकरणी गुन्हा दाखल केला होता. कटकारस्थान, फसवणूक, बनावट कागदपत्रे तयार करणे आणि ती खरी असल्याचे भासवून वापरणे तसेच माहिती-तंत्रज्ञान कायद्यातील संबंधित कलमांनुसार हा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

सीबीआयच्या तपासानुसार, २०१३ मध्ये भारतातून कार्यरत असलेल्या आरोपींनी सिंगापूरमध्ये राहणाऱ्या किंवा काम करणाऱ्या भारतीयांना लक्ष्य केले. आरोपी सिंगापूरच्या इमिग्रेशन अधिकाऱ्यांच्या नावाने बनावट फोन कॉल करत होते.

पीडितांनी विमानतळावरील ‘डिसेंबार्केशन फॉर्म’मध्ये चुकीची माहिती दिल्याचे सांगून त्यांच्यावर गुन्हा दाखल होऊ शकतो आणि त्यांना देशातून हद्दपार केले जाऊ शकते, अशी भीती घातली जात होती. त्यानंतर कथित ‘सेटलमेंट फी’ किंवा दंडाच्या नावाखाली वेस्टर्न युनियन मनी ट्रान्सफरद्वारे भारतातील ठरावीक व्यक्तींना पैसे पाठवण्यास भाग पाडले जात होते.

तपासात फसवणुकीतून मिळालेली रक्कम हरनेक सिंगच्या मनी ट्रान्सफर आउटलेटच्या माध्यमातून स्वीकारली जात असल्याचे समोर आले. या व्यवहारात सहआरोपी आदित्य भारद्वाज आणि दीपक जैन यांच्याशी त्याचा संबंध असल्याचे तपासात निष्पन्न झाले.

२०१३ मध्ये भारतातून पलायन

  • फसवणुकीचा प्रकार उघडकीस आल्यानंतर हरनेक सिंग मे २०१३ मध्ये भारतातून फरार झाला. त्यानंतर तो बेकायदेशीररीत्या अमेरिकेत दाखल झाला आणि दशकाहून अधिक काळ तपास यंत्रणांच्या हाती लागला नाही.

  • त्याच्याविरुद्ध सुरू असलेल्या कायदेशीर कारवाईदरम्यान इतर आरोपींवरील न्यायालयीन प्रक्रिया मात्र सुरू राहिली. अखेर अमेरिकेतून त्याला भारतात परत आणण्यात सीबीआयला यश आले.

  • पंचकुला येथील विशेष न्यायिक दंडाधिकारी (सीबीआय प्रकरणे) न्यायालयात त्याला लवकरच हजर केले जाणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT