मुंबई : मध्य रेल्वेच्या हार्बर रेल्वे मार्गावर शुक्रवारी सकाळी गर्दीच्या वेळेत मोठा तांत्रिक बिघाड झाल्याने लोकल सेवा विस्कळीत झाली होती. चेंबूर-टिळक नगर स्थानकांदरम्यान ओव्हरहेड इक्विपमेंट (ओएचइ) वायर तुटल्याने हार्बर मार्गावर लोकल खोळंबा झाला. त्याचा वाहतुकीला मोठा फटका बसला.
साधारण सकाळी ९.१६ वाजता वायर तुटल्यामुळे हार्बर मार्गावरील लोकल सेवा पूर्णपणे थांबविण्यात आली होती. त्यामुळे अनेक लोकल गाड्या स्थानकात अडकून पडल्या होत्या. एकामागोमाग एक लोकल रुळांवर उभ्या होत्या. संपूर्ण हार्बर मार्गावरील गाड्यांचे वेळापत्रक कोलमडले होते. सकाळी गर्दीच्या वेळी घडलेल्या या प्रकारामुळे हजारो प्रवाशांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला.
दीर्घकाळ वाट पाहून सुद्धा लोकल सुरू न झाल्याने अनेक प्रवाशांना थेट रुळांवर उतरून जवळच्या स्थानकापर्यंत पायपीट केली. काही स्थानकांवर प्रवाशांची प्रचंड गर्दी झाली होती. रेल्वे प्रशासन आणि सुरक्षा यंत्रणांनी घटनास्थळी धाव घेत प्रवाशांना माहिती देत होते. लोकल सेवा पूर्ववत करण्यासाठी युद्धपातळीवर तांत्रिक पथकानी तातडीने दुरुस्तीची कामे हाती घेतली. त्यानंतर सकाळी ९.५२ वाजता दुरुस्तीचे काम पूर्ण झाले.
एसी लोकल रद्द
हार्बर रेल्वेच्या खोळंब्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते बेलापूर अशी दुपारी १ वाजून ७ मिनिटांची आणि वडाळा ते पनवेल अशी १ वाजून १७ मिनिटांची एसी लोकल कोणतीही पूर्वसूचना न देता रद्द करण्यात आली. त्यामुळे या रेल्वेने नियमित प्रवास करणाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली.