मुंबई : ठाकरे बंधू एकत्र येत असतील तर आनंदच आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे बंधूंच्या ताज्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली आहे. शिवसेना (उबाठा) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी एकमेकाकडे मैत्रीचा हात केल्यानंतर शिवसेना (उबाठा) आणि मनसेच्या नेत्यांनी या घडामोडीचे स्वागत केले असून भाजप, शिवसेना (शिंदे) गटानेही सावध प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.
एकाने साद दिली आणि दुसर्याने प्रतिसाद देताना शर्तीही ठेवल्या आहेत. आता त्यावर मी काय बोलणार? त्यांनाच विचारले पाहिजे. वाट बघा, पाहूया पुढे काय होते ते, अशी सूचक प्रतिक्रिया मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली. आगामी मुंबई महापालिका असोत वा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या इतर निवडणुका भाजपच्या नेतृत्वाखालील महायुतीच जिंकेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
सध्याची राजकीय परिस्थिती इतकी गंभीर आहे की, बोलतात वेगळे आणि करतात वेगळे. अशांना आम्ही थारा देणार नाही, हा विचार राज यांनी करणे गरजेचे आहे. साद-प्रतिसादाची भूमिका घेतली असेल तर सकारात्मक भूमिकेतून आम्ही याकडे पाहात आहोत, असे शिवसेना नेते संजय राऊतांनी स्पष्ट केले.
आम्हाला सर्वांना वाटते की, महाराष्ट्रासाठी या सर्व गोष्टी घडल्या पाहिजेत. मात्र, हे जसे आम्हाला वाटते, तसे समोरच्यांना वाटते की नाही हा महत्त्वाचा प्रश्न आहे, अशी प्रतिक्रिया मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी दिली.
या दोन्ही नेत्यांमध्ये युती होण्याची शक्यता कमी आहे. हे दोन्ही नेते एकत्र येऊ शकत नाहीत, असे भाकीतच शिवसेना शिंदे गटाने केले आहे. या गटाचे प्रवक्ते व नेते संजय शिरसाट यांनी ही शक्यता बोलून दाखवली.
राज ठाकरे यांना त्यांच्या पक्षाची भूमिका मांडण्याचा अधिकार आहे. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे युती होत असल्यास भाजपला मध्ये येण्याचे काही कारण नाही, अशी भूमिका भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मांडली आहे.