पुढारी ऑनलाईन डेस्क : गेल्या काही दिवसांपासून राज्यातील बहुतांश भागात पावसाचा जोर सुरु आहे. यामुळे भात कापणी, भुईमूग, सोयाबीन काढण्याची कामे ठप्प झाली आहेत. काही ठिकाणी भात, सोयाबीन पिकाचे पावसाने नुकसान झाले आहे. दरम्यान, भारतीय हवामान विभागाने आज मध्य महाराष्ट्रात (Maharashtra Weather Update) काही ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता वर्तवली आहे.
तसेच आज कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र, गुजरात, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, कर्नाटकचा दक्षिण आणि उत्तर अंतर्गत भाग, अंदमान आणि निकोबार बेट आणि ओडिशा येथे जोरदार पावसाची शक्यता असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे.
या आठवड्यात कोकण, गोवा आणि मध्य महाराष्ट्रात हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे. तर १९ ते २० ऑक्टोबर दरम्यान या भागातील काही ठिकाणी जोरदार पाऊस पडणार असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे.
पश्चिममध्य आणि लगतच्या पश्चिममध्य अरबी समुद्रावरील कमी दाबाचे क्षेत्र पुढील २ दिवसांत पश्चिम-वायव्येकडे सरकण्याची शक्यता आहे. तसेच २१ ऑक्टोबरच्या सुमारास मध्य बंगालच्या उपसागरावर नवीन कमी दाब क्षेत्र निर्माण होण्याची शक्यता आहे. दरम्यान, आज दक्षिण द्वीपकल्पीय भारताच्या काही भागांत मुसळधार पावसाची शक्यता आहे. २० आणि २१ रोजी अंदमान आणि निकोबार बेटांवर आणि २४ ते २५ ऑक्टोबर दरम्यान पूर्व द्वीपकल्पीय किनाऱ्यावरील काही भागांतही मुसळधारेची शक्यता असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे.