मुंबई ः लाखो रुपये खर्चून गुजरातहून आणलेला नवा तराफा यंदा पहिल्यांदाच वापरला जात होता. पण भरती-ओहोटीचे योग्य नियोजन न झाल्याने बाप्पा जवळपास रविवारी सकाळी 8 वाजता गिरगाव चौपाटीवर दाखल झाला. लालबागच्या राजाचे विसर्जन तब्बल 13 तास रखडल्याचे पाहायला मिळाले.  ( छाया : दीपक साळवी)
मुंबई

Lalbagcha Raja Visarjan : गुजराती तराफ्याचे विसर्जनात विघ्न

गिरगावचे कोळीबांधव लालबागच्या राजाच्या मंडळावर संतप्त

पुढारी वृत्तसेवा

मुंबई : दरवर्षी लालबागच्या राजाचे विसर्जन अनंत चतुर्दशीच्या दुसर्‍या दिवशी 12 वाजेपर्यंत होत असते. मात्र, रविवारी सकाळी 8 वाजता गिरगाव चौपाटीवर येऊनही विसर्जनाला रात्रीचे जवळपास सव्वानऊ वाजले. हे विसर्जन रखडण्यामागे गुजरातला दिलेले कंत्राट असल्याचा आरोप गिरगावातील कोळी बांधव हिरालाल पांडुरंग वाडकर यांनी केला आहे. याआधी वाडकर बंधू वर्षानुवर्षे लालबागच्या राजाच्या मूर्तीचे विसर्जन करत होते.

लाखो रुपये खर्चून गुजरातहून आणलेला नवा तराफा यंदा पहिल्यांदाच वापरला जात होता. पण भरती-ओहोटीचे योग्य नियोजन न झाल्याने बाप्पा जवळपास 10 ते 12 तास चौपाटीवरच अडकून राहिल्याने नाखवा हिरालाल वाडकर यांनी मंडळावर थेट आरोप केले.

आम्ही वाडकर बंधू वर्षानुवर्षे लालबागच्या राजाचे विसर्जन करत आलो. समुद्र आमच्या रक्तात आहे, भरती-ओहोटीचे ज्ञान आम्हाला आहे. पण आता मंडळाने गुजरातच्या तराफ्याला हा मान दिला आणि त्यामुळेच विसर्जन रखडले,असे त्यांनी स्पष्ट केले. विसर्जनाचा मान कोळी समाजाला मिळत नाही, हे वर्षानुवर्षे सुरू असलेले दुर्लक्ष आहे, अशी खंत अनेक कोळी बांधवांनीही व्यक्त केली.

विसर्जन रखडताच भाविकांनी सोशल मीडियावरून व्यक्‍त केला संताप

  1. लालबागचा राजा मंडळाची दर्शन व्यवस्था, व्हीआयपी आणि सर्वसामान्य भाविकांबद्दल मंडळ करत असलेला भेदभाव यामुळे नाराज झाल्याने बाप्पा जाण्यास तयार नाही. सर्वसामान्यांना दर्शन देण्यासाठीच बाप्पा अजूनही विसर्जनास तयार नसल्याची भावना यावेळी भाविकांनी व्यक्त केली.

  2. लोकांना लाथा मारून एका मुलीच्या बापाला तिच्या समोर मारहाण करणारे कार्यकर्ते, शिवीगाळ करणारे कार्यकर्ते असल्यावर कसा राजा जाईल सांगा? सर्व कार्यकर्त्यांनी हात जोडून माफी मागायला पाहिजे. तरच राजा विसर्जनाला जाईल,

  3. विसर्जनाचा मान कोळी लोकांचा असतो. दरवर्षी विसर्जन करायला लोकांच्या बोटी खेचून समुद्रात घेऊन जातात.. यावर्षी इलेक्ट्रिक तराफा बनवून विसर्जन करणार होते.. पण बाप्पा दरवर्षीचा मान स्वतः पूर्ण करून घेईल. शेवटी कोळी लोकांच्या बोटीनेच विसर्जनाचा मान पूर्ण होईल, लालबागच्या मंडळाचा माज लालबागच्या राजानेच मोडला, पापांचा हिशोब करून जाणार! अशाही प्रतिक्रिया वाचायला मिळत आहेत.

  4. लालबागचा राजा सर्वकाही बघतो... श्रीमंत लोकांना व्हीआयपी दर्शन आणि सर्वसामान्य भक्तांना ढकलून, कार्यकर्ते पायाने लाथा मारून तुडवून, शिव्या देऊन दर्शन घडवतात... हा सर्वसामान्य लोकांवर झालेला अपमान राजा कधीच खपवून घेणार नाही. म्हणून यावेळी तो रागावला आहे, अशा प्रकारच्या भावना सोशल मीडियावर व्यक्त करून भाविकांनी आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT